⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यात ‘या’ अभियानास झाली सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाश्रमदान कार्यक्रमातून ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.२ रोजी ग्रामपंचायत, चांदसर (ता.धरणगाव) येथून सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नागरीकांनी स्वच्छतेचे महत्व जाणल्यानेच आपण कोविडचा प्रादुर्भाव रोखू शकलो. जिल्ह्यात कोविड काळातही आरोग्यदूत, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले. महात्मा गांधीजींचा स्वच्छतेचा संकल्प प्रत्येक नागरीकांने यापुढील काळातही मनाशी करुन आपले घर आणि परिसर अधिकाधिक स्वच्छ राहील यासाठी स्वत:हून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही चांगल्या कामात लोकसहभाग असेल तर कामे अधिक दर्जेदार होऊन गावाची प्रगती होते. याचे उदाहरण म्हणजे चांदसर हे गाव असून याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आणि सरपंच सचिन पवार यांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या मनोगतात आरोग्याची पंचसूत्री सांगून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच ई-पीक पाहणी, पीक पेरा व सातबारा याबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना सातबाराचे वाटपही करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानाचे महत्त्व सांगितले. तसेच येत्या १०० दिवसात करावयाच्या कामांचे नियोजन सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. नंतर ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेल्या अंगणवाडी सुशोभीकरण कामाची पाहणी केली. आपल्या मनोगतात सरपंच सचिन पवार यांनी जिल्ह्यातील पहिली वातानुकूलित अंगणवाडी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचलन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.

अशी आहेत अभियानाची वैशिष्टे
अभियानामध्ये जिल्हाभरात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पुढील १०० दिवसात ५० शोषखड्डे तसेच मागणीप्रमाणे खताचे खड्डे याचे बांधकाम लोकसहभाग, १५ वा वित्त आयोग, मनेरेगा आशा विविध योजनांमधून करण्यात येणार आहेत. प्रति तालुका २५ घनवन प्रकल्प साकारणार आहेत तसेच घरातील प्लास्टिक घरातील कुंडी किंवा रिकाम्या डब्ब्यात भरून ठेवून नंतर ग्रामपंचायतस्तरावर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. तसेच १६ कलमी कार्यक्रमातंर्गत प्रत्येक शाळा, अंगणवाडी यांना सुलभ शौचालय, वीज जोडणी, परसबाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डिजिटल शिक्षण आदी बाबीचा समावेश असणार आहे.