⁠ 
बुधवार, मे 8, 2024

शेतांमधून केबल वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; १४५ किलो तांब्याची तार जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । वीज पंपासाठी लावलेल्या केबल वायरची चोरी करणाऱ्या ६ जणांच्या टोळी जेरबंद करण्यात बोदवड पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून दीड लाख रुपये किमतीची केबल वायर मधील १४५ किलो वजनाची तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातुन केबल वायर चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती. दरम्यान, या केबल वायर चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्या दिशेने तपास सुरु असतांना दि.११ ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चेतन प्रमोद नेहेते (रा.नाडगाव ता.बोदवड) याला ताब्यात घेऊन केबल वायर चोरीबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने अविनाश बाबू माळी (रा. भिलवाडा, बोदवड), नाना दगडू मोरे (रा. भिलवाडा, बोदवड), किसन भिमा मोरे (वय-२८), स्वराज प्रकाश मालचे (वय- ३०, दोन्ही रा. राका हायस्कूलसमोर, जामनेर रोड, बोदवड), विक्रम गायकवाड, नितीन गायकवाड (दोन्ही रा. भिलवाडा, बोदवड) यांचे सोबत मिळून नाडगाव, जुनोना, हिंगणा, नांदगाव, कुऱ्हा हरदो, राजूर शिवारात केबलची चोरी केल्याची कबुली दिली. दिलेल्या माहितीवरून बोदवड पोलिसांनी सर्व संशयितांना दि.१२ ऑक्टोबरला अटक केली. त्यांचेकडून १ लाख ४५ हजार ५०० रूपये किमतीची केबलमधील तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील अयुब तडवी, सचिन चौधरी, शशिकांत महाले, भगवान पाटील, दीपक पाटील, निखिल नारखेडे, मुकेश पाटील, तुषार इंगळे, नीलेश सिसोदे, वसीम तडवी यांनी ही कारवाई केली. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.