⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव दूध संघातील लोणी साठविले जायचे ५०० किलोमीटर दूर, वाईला…पण का?

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2023 । एखाद्या दूध डेअरीत, दूधाच्या फॅक्टरीत दूधावर प्रक्रिया करुन दूग्धजन्य पदार्थ तयार केले तर ते कुठे जातील? अर्थात जेथे तयार केले त्याच ठिकाणी कोल्ड स्टोअरेजमध्ये!, हेच तुमचे उत्तर असेल. जळगाव जिल्हा दूध संघात तयार केले जाणारे लोणी व अन्य दूग्धजन्य पदार्थांची साठवणूक करण्यासाठी जळगावपासून ५०० किलोमीटर अंतरावर असणार्‍या सातारा जिल्ह्यातील वाई येथील कोल्ड स्टोरेजमध्ये पाठविले जात होते. या लोण्याची जेंव्हा गरज भासेल तेंव्हा त्याला पुन्हा जळगावला आणून त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे समोर आले आहे. आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, असे का? तर या प्रश्‍नाचे उत्तर कुणीच द्यायला तयार नाही.

दूध संघात उत्पादित होणारे लोणी व अन्य दूग्धजन्य पदार्थ साठवणूकीसाठी ५०० किलोमीटर दूर वाई येथे पाठविले जात होते. तेच पदार्थ साठवणुकीची व्यवस्था आता अवघ्या ५० मीटर अंतरावर करण्यात आली आहे. दूध संघाच्या प्रशासकीय इमारतीसामोर मोठी रिकामी जागा आहे. या जागेवर कोल्ड स्टोरेजसारखी व्यवस्था असलेले कंटेनरची कोल्डचेन उभारण्यात आली आहे. यामुळे आता दूध संघात उत्पादित होणारी उत्पादने वाईच्या कोल्ड स्टोरेजऐवजी दूध संघातच ठेवली जाणार आहे. या निर्णयामुळे जळगाव ते वाई दरम्यान वाहतूकीसाठी खर्च होणार्‍या १५ लाख रुपयांची दरवर्षी बचत होणार आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांचे दूध संघावर अनेकवर्ष वर्चस्व होते. आता दूध संघाचा ताबा भाजपनेते गिरीष महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या ताब्यात आला आहे. नवा भिडू नवा राज या प्रमाणे नव्या संचालक मंडळाने खडसेंच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय बदलण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात नोकर भरती रद्द केल्यानंतर आता वाई येथे साठवणुकीचा निर्णय देखील बदलण्यात आला आहे.

दूध संघाचा इतिहास
दुधाच्या महापूर योजनेअंतर्गत १९७१ मध्ये जळगावला (कै.) जे. टी. महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. सन १९७५ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. जळगाव जिल्हा दूध संघाची पूर्वी तीन लाख लिटर क्षमतेचे प्रक्रिया केंद्र होते. मात्र आता तब्बल ५ लाख लिटर क्षमतेचे केंद्र सुरू उभारण्यात आले आहे. दूध संघात दुग्धजन्य पदार्थाचे नवीन प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक व टोमॅटिक केंद्र आहे. यात खवा आणि पेढा निर्मिती प्रक्रीया केंद्रही उभारण्यात आले आहे. एकीकडे ही जमेची बाजू असतांना पाच लाख लिटर क्षमतेचा संघ पूर्ण क्षमतेने कधीच चालला नाही. मधल्या कळात अतिरिक्त कर्मचार्यांची भरती केली गेली. तुपाला पाय फुटले, लोण्याला बोके लागले आणि संघ डबघाईला येवून १७ कोटींच्या तोट्यात गेला. त्यानंतर एनडीडीबीने दूध संघ ताब्यात घेतला. त्यानंतर दूध संघ पून्हा नफ्यात आला.