रेल्वे आणि शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोडी, लाखोंचा ऐवज लांबविला

मार्च 30, 2022 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । शहरातील रेल्वे स्टेशनजवळच आणि शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या नवीपेठ परिसरात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. लोखंडी खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी अंदाजे १५ ते २० लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे.

नवीपेठ परिसरात पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल वय-५२ हे परिवारासह राहतात. मोबाईल रिपेअरिंग करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. दि.२४ मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते.

राजू अग्रवाल यांच्या घराच्या शेजारीच रेल्वेची हद्द असून त्याठिकाणी रेल्वेचे एक जुने ऑफिस देखील आहे. चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला. कपाट फोडत चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, मोतीहार, बारा कानातले, सोन्याचे तुकडे, २ अंगठी, ३ सोन्याचे शिक्के, चैन असा जवळपास २५ ते ३० तोळे दागिने आणि देव्हाऱ्यात ठेवलेले ८ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.

बुधवारी अग्रवाल कुटुंबीय घरी आले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, कर्मचारी योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, अक्रम शेख, संजय हिवरकर, मोरे यांच्यासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, अविनाश देवरे आदी पोहचले आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांनी पाहणी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now