बैलांचा बाजार : जामठीत दीड लाखांपर्यंत बैलजोडीचे व्यवहार
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । बोदवड तालुक्यातील जामठी येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, संसारोपयोगी वस्तूंची विक्री केली जाते. याशिवाय बोदवड-जामठी या मुख्य रस्त्यावरील बाजार समितीच्या यार्डात गुरांचा बाजार देखील भरतो. एरव्ही येथे वर्षभर गुरांची खरेदी विक्री होत असली तरी खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मोठी उलाढाल होते. याअनुषंगाने शनिवारी अनेकांनी बैलजोड्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
खरिपाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी बैलजोड्यांची गरज भासते. त्यासाठी अनेक शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करण्यासाठी जामठीच्या बाजारात येतात. बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, सावदा, फैजपूर, जामनेर, मोताळा, बुलडाणा, सिल्लोड, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, डोईफोडा, खोकणार येथून शेतकरी, व्यापारी या बाजारात बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी येतात. शनिवारी देखील या बाजारात चांगलीच गर्दी झाली होती. त्यामुळे एका बैलजोडीची किमान ५० हजार ते दीड लाख असे व्यवहार होताना दिसते. प्रामुख्याने पंढरपुरी जातीच्या बैल जोडीसह देशी बैल जोड्यांना मागणी दिसली. याशिवाय शेळ्या, गीय, म्हशींचे देखील व्यवहार झाले.