⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खळबळजनक : आदिवासी शेतकऱ्यांच्या ४०० एकर शेतजमींनीवर फिरवला बुलडोझर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील सातपुड्यातील रावेर तालुक्यात कुसूंबा व लोहार या शिवारात एक धक्कादाक घटना घडली आहे. ती म्हणजे, तब्बल १२० आदिवासी शेतकऱ्यांच्या एकूण ४०० एकर शेतजमींनीवरील सोयाबीन तसेच ज्वारी या पिकांवर यावल वनविभागाने जेसीबी फिरवून कारवाई केली आहे.संबंधित आदिवासी शेतकरी हे वनदावेदार असल्याबाबतचे त्यांच्याकडे पुरावे सुध्दा आहेत.मात्र या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी कि, रावेर तालुक्यात कुसूंबा व लोहार या शिवारात तब्बल १२० आदिवासी शेतकऱ्यांच्या एकूण ४०० एकर शेतजमींनीवरील सोयाबीन तसेच ज्वारी या पिकांवर यावल वनविभागाने जेसीबी फिरवून कारवाई केली आहे.संबंधित आदिवासी शेतकरी हे वनदावेदार असल्याबाबतचे त्यांच्याकडे पुरावे सुध्दा आहेत. अशा आदिवासींवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करु नये असे आदेश असतांनाही वनविभागाने आकसबुध्दीतून ही कारवाई केल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा व आदिवासींच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.

तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील कुठलेही मूळ रहिवासी नसतांना, त्यांच्याकडे पुरावे अथवा त्यांचे वनदावे दाखल नसतांना, मध्यप्रदेशातील तब्बल चार हजार नागरिक हे सातपुड्याच्या वनांमध्ये बेकायदेशीरपणे शेती करुन अतिक्रमण करत आहेत. त्यांच्याकडून वनविभागाचे अधिकारी पैसे घेतात व त्यांना शेती करण्यास परवानगी दिली जाते यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरापेही लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.

याबाबत वारंवार जिल्हाधिकारी, तसेच वनविभाग मंत्री, सचिव यांच्याकडे तक्रार करण्यात आलेल्या आहेत. मात्र, तरीही कारवाई केली जात नसल्याचंही प्रतिभा शिंदे यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे जे कायदेशीरपणे वनदावे दाखल करुन शेती करत आहेत त्यांना देखील आकसबुध्दीने वारंवार कारवाई करुन त्रास दिला जात असल्याचेही प्रतिभा शिंदे म्हणाल्या. दरम्यान याच आकसबुध्दीतून ही कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.