जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एक दुर्दैवी घटना घडली. ज्यात विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता विजेचा जोरदार झटका बसल्याने १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. लोकेश सोपान पाटील (वय १५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून या घटनेने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवाशी लोकेश हा आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू यांच्यासह पाळधी येथे वास्तव्यास होता. पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे घरची परिस्थिती हलाखीची होती. दरम्यान २५ जानेवारीला संध्याकाळी लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता.
पतंग उडवत असताना लोकेशचा पतंग विद्युत तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्यासाठी लोकेश हा जवळच राहत असलेल्या त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर गेला. विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना त्याला विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना पाहून त्याच्यासोबत खेळत असलेले त्याचे मित्र घाबरून पळाले.
कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. काही क्षणात मुलासोबत होत्याचे नव्हते झाल्याने अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. घटनेची पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.