जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादातून जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना धमकविण्यात आल्याप्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरुद्ध १५ जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी कल्पेश भोईटे व प्रशांत भोईटे यांना अटक केली आहे.

जुना निमखेडी रस्त्यावर असलेल्या कांताई नेत्रालयाच्या मागील बाजूस मविप्रचे जयवंत बाबुराव भोईटे हे परिवारासह राहतात. मविप्रच्या वादामुळे जयवंत भोईटे यांच्यावर आजवर दोन वेळा हल्ला करण्यात आला आहे. दि.१५ जुलै २०२१ रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास भोईटे हे घराच्या कंपाउंडला कुलूप लावून घरात आराम करत बसले होते. अचानक त्यांना घरावर कुणीतरी दगड फेकत असल्याचे जाणवल्याने भोईटे यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. कल्पेश संभाजी भोईटे, प्रशांत विलास भोईटे, हेमंत जयवंत येवले हे दगडफेक करताना दिसून आले. जयवंत भोईटे यांनी जाब विचारला असता ते तिघे कंपाउंड गेटवरून उडी मारत आत आले आणि निलेश भाऊने तुला शेवटची ताकीद दिली आहे असे धमकावले. आवाज ऐकून शेजारील एक महिला बाहेर आली असता हल्लेखोरांनी त्यांना देखील धमकावले. यावेळी हल्लेखोरांनी लाकडी दांड्याने दुचाकीचे देखील नुकसान केले.

याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन गेल्या महिन्यात फेटाळून लावला होता. गुरुवारी तालुका पोलिसांनी कल्पेश भोईटे व प्रशांत भोईटे यांना अटक केली आहे.
हेही वाचा :
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !
- गिरणा नदीपात्रात धडक कारवाई ; २९ वाहने ताब्यात, ३.६० कोटींचा मुद्देमाल ताब्यात
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू










