दिल्लीनंतर आणखी एका स्फोटाची भयंकर घटना ; 9 जण ठार, अनेक जखमी

नोव्हेंबर 15, 2025 11:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापूर्वी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देशात खळबळ उडाली असून दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली. श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. या स्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

blast srinagar

मिळालेल्या माहितीनुसार, नौगाम पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आणि त्याचे पडसाद अनेक किलोमीटरपर्यंत उमटले. स्फोटामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक घाबरले. स्फोटानंतर पोलिस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला तसंच अनेक वाहनांनी पेट घेतला. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये मृतांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ११:२२ वाजता झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भंयकर स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोट इतका भयंकर होता की आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. स्फोटानंतर पोलिस स्टेशनच्या आतमध्ये छोटे छोटे स्फोट होत होते त्यामुळे बचाव पथकाला आतमध्ये जाण्यासाठी एक तास लागला. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now