जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । एकीकडे राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगावच्या बोदवड तालुक्यात अपघाताची एक घटना समोर आलीय. ज्यात बोदवडहुन भुसावळ जाणाऱ्या बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सरळ रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबावर आणि नंतर झाडाला आदळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

याबाबत असे की, बोदवड येथून भुसावळला जाणारी बस (एमएच २० बीएल ९०२२) भानखेडा (ता. बोदवड) गावाजवळ आली. ही बस एन. डी. पाटील नावाचे चालक चालवत होते. बसचालक एन. डी. पाटील यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला.

यांनतर बस खांबाला धडक देत पुढे असलेल्या झाडाला आदळली. बसमध्ये जवळपास बारा ते पंधरा प्रवासी होते. सुदैवाने, कोणालाही किरकोळ दुखापत वगळता जादा इजा झाली नाही. मात्र या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी बचावले आहेत.
घटनेनंतर वाहकाने भुसावळ आगार आणि बोदवड बसस्थानकाला तत्काळ सूचना दिल्यामुळे प्रवाशांसाठी दुसरी बस पाठवण्यात आली. त्यात सर्व प्रवासी बसून पुढील प्रवासासाठी निघाले. या चालकाबाबत याच्याआधीही दोन वेळा प्रकृती अचानक बिघडल्याने अपघात घडल्याची चर्चा आहे परंतु यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
प्रवाशाने दिला वेळीच सीपीआर
या बसमधील गणेश भगवान पवार (४२, रा. शेलवड) याने प्रसंगावधान राखत चालक पाटील यांना सीपीआर दिला. अपघात घडल्यानंतर काही वेळातच या रस्त्याने डंपर चालला होता. या डंपरचालकाला प्रवाशांनी थांबवले. या डंपरमधून चालकाला भुसावळकडे तातडीने रवाना करण्यात आले. चालक पाटील यांच्यावर भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.











