जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मार्च २०२१ | एरंडोल पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय मुलीने सरकारी निवासस्थानात गळफास घेवून आत्महत्या केली.
रोहिणी हरिभाऊ चंदनकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, रोहिणी हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
याबाबत असे की, आशालता वानखेडे ह्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानी परिवारासह राहतात. आशालता वानखेडे ह्या मंगळवारी (ता. 2) नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्या होत्या. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याना त्यांची सोळा वर्षीय मुलगी रोहिणी हरिभाऊ चंदनकर हिने डोक्याला बांधण्याच्या फेट्याचा कापड घराच्या छताला असलेल्या पंख्याला बांधून गळफास घेतलेल्या दिसून आली. त्यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली.
नागरिकांनी रोहिणी हिस ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.मयत रोहिणी चंदनकर हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर चिठ्ठीमध्ये आहे.
याबाबत विजय रामचंद्र वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील, अनिल पाटील करीत आहेत.