जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित अर्थातच जनरल तिकीटावर प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने आरक्षित विशेष गाड्या अनारक्षित विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्यांमधील प्रत्येकी तीन स्लिपर कोच हे आरक्षित डबे वगळता, इतर सर्व १० जनरल डबे असतील. मात्र, या गाड्यांमधून प्रवासासाठी प्रवाशांना एक्स्प्रेसचे भाडे मोजावे लागेल. दरम्यान, शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होताच तब्बल ३३७ दिवसांपासून बंद असलेली भुसावळ जंक्शनवरील जनरल तिकीट खिडकी ६ मार्चला उघडली.
कोरोनामुळे केवळ कन्फर्म आरक्षण असेल तरच विशेष रेल्वेतून प्रवासाला परवानगी आहे. दुसरीकडे पॅसेंजर गाड्या बंद असून चाकरमानी, पासधारकांचे हाल होत आहेत. त्यानुसार ६ मार्चपासून भुसावळ-नंदुरबार (अप-डाउन ०९०७७/०९०७८) अाणि भुसावळ-सूरत (अप-डाउन ०९००७/०९००८) या दोन एक्स्प्रेस गाड्यांमधून जनरल तिकिटावर प्रवासाला ग्रीन सिग्नल मिळाला. या दोन्ही गाड्यांचे सर्व डबे यापूर्वी आरक्षित होते. त्यात बदल करून दोन्ही गाड्यातील प्रत्येकी तीन स्पिलर कोच वगळता उर्वरित सर्व १० डबे जनरल (अनारक्षित) करण्यात आले.
दोनच गाड्यांना सुविधा : सध्या भुसावळ-सूरत व भुसावळ-नंदुरबार या दोनच गाड्यांसाठी जनरल (अनारक्षित) तिकिटे दिली जातील. इतर कोणत्याही गाडीसाठी ही सुविधा नसेल. या गाड्यांमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने तोंडाला मास्क लावणे आणि काेविड-९चे नियम पाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले. तसेच सकाळी ९ वाजता सुटणाऱ्या भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेससाठी शनिवारी पहिल्या दिवशी १५ प्रवाशांनी १० जनरल तिकिटे खरेदी केली. हे प्रवासी जळगाव, नंदूरबार येथे जाणारे होते.
भुसावळ-सूरत एक्स्प्रेस : रात्री ८.२० वाजता भुसावळहून सुटणाऱ्या या गाडीला अनुक्रमे जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, खांडबारा, नवापूर, उकाई, सोनगढ, व्यारा, मढी, मॅन्ग्रोला, बारडोली, गंगाधरा, बागुमरा, चलथान, उधना थांबा आहे. सकाळी ६ वाजता सुरतला पोहोचणारी ही गाडी सुरतहून सायंकाळी ५ वाजता सुटून रात्री १.३० वाजता भुसावळ पोहोचेल.
भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस : सकाळी ९ वाजता भुसावळून सुटणाऱ्या या गाडीला अनुक्रमे जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, टाकरखेडा, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, शिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाळा, तिसी, चौपाले असे थांबे आहेत. दुपारी १.४० वाजता नंदुरबारला पोहोचलेली ही गाडी २.३० वाजता परतीचा प्रवास सुरू करेल.
भुसावळ ते सूरत मार्गावरील या दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करताना भुसावळ ते जळगाव ३०, अमळनेर ४५, नंदुरबार ७५ आणि सूरतपर्यंत १२० रुपये भाडे लागेल. पूर्वी देखील हेच दर कायम होते. त्यात कोणताही बदल झालेला नाही. एक्स्प्रेसने जनरल बाेगीतून प्रवास करता येईल. अर्थात, चाकरमान्यांना दिलासा मिळाला.