⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

किनगावात माथेफिरूने जाळला तयार गहू ; २० हजारांचे नुकसान

0
kingaon

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गावालगतच्या शेतातील गहू माथेफिरूने जाळला. ही घडना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यात शेतकऱ्यांचे २० हजारांचे नुकसान झाले. 

 

किनगाव येथील निसार सुभान खाटीक यांनी गावालगत नायगाव रस्त्यावरील दीड बिघे शेतात (गट क्रमांक १९/१) गहू पेरणी केली होती. तयार झालेला हा गहू कापून त्यांनी शेतात ढिग करून ठेवला होता. त्यास शुक्रवारी रात्री कुणीतरी माथेफिरूने पेटवून दिले.

 

शनिवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. मंडळाधिकारी सचिन जगताप, तलाठी प्रवीण पाटील, कोतवाल गणेश वराडे यांनी पंचनामा केले. त्यात सुमारे १३ क्विंटल गहू जळाल्याचा अंदाज आहे.

चाकरमान्यांसाठी खुशखबर ! आता सुरत, नंदुरबार एक्स्प्रेसने करा जनरलमधून प्रवास

0
new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित अर्थातच जनरल तिकीटावर प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने आरक्षित विशेष गाड्या अनारक्षित विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या गाड्यांमधील प्रत्येकी तीन स्लिपर कोच हे आरक्षित डबे वगळता, इतर सर्व १० जनरल डबे असतील. मात्र, या गाड्यांमधून प्रवासासाठी प्रवाशांना एक्स्प्रेसचे भाडे मोजावे लागेल. दरम्यान, शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होताच तब्बल ३३७ दिवसांपासून बंद असलेली भुसावळ जंक्शनवरील जनरल तिकीट खिडकी ६ मार्चला उघडली.

 

कोरोनामुळे केवळ कन्फर्म आरक्षण असेल तरच विशेष रेल्वेतून प्रवासाला परवानगी आहे. दुसरीकडे पॅसेंजर गाड्या बंद असून चाकरमानी, पासधारकांचे हाल होत आहेत.  त्यानुसार ६ मार्चपासून भुसावळ-नंदुरबार (अप-डाउन ०९०७७/०९०७८) अाणि भुसावळ-सूरत (अप-डाउन ०९००७/०९००८) या दोन एक्स्प्रेस गाड्यांमधून जनरल तिकिटावर प्रवासाला ग्रीन सिग्नल मिळाला. या दोन्ही गाड्यांचे सर्व डबे यापूर्वी आरक्षित होते. त्यात बदल करून दोन्ही गाड्यातील प्रत्येकी तीन स्पिलर कोच वगळता उर्वरित सर्व १० डबे जनरल (अनारक्षित) करण्यात आले.

 

दोनच गाड्यांना सुविधा : सध्या भुसावळ-सूरत व भुसावळ-नंदुरबार या दोनच गाड्यांसाठी जनरल (अनारक्षित) तिकिटे दिली जातील. इतर कोणत्याही गाडीसाठी ही सुविधा नसेल. या गाड्यांमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने तोंडाला मास्क लावणे आणि काेविड-९चे नियम पाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले. तसेच सकाळी ९ वाजता सुटणाऱ्या भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेससाठी शनिवारी पहिल्या दिवशी १५ प्रवाशांनी १० जनरल तिकिटे खरेदी केली. हे प्रवासी जळगाव, नंदूरबार येथे जाणारे होते.

 

भुसावळ-सूरत एक्स्प्रेस : रात्री ८.२० वाजता भुसावळहून सुटणाऱ्या या गाडीला अनुक्रमे जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, खांडबारा, नवापूर, उकाई, सोनगढ, व्यारा, मढी, मॅन्ग्रोला, बारडोली, गंगाधरा, बागुमरा, चलथान, उधना थांबा आहे. सकाळी ६ वाजता सुरतला पोहोचणारी ही गाडी सुरतहून सायंकाळी ५ वाजता सुटून रात्री १.३० वाजता भुसावळ पोहोचेल.

 

भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस : सकाळी ९ वाजता भुसावळून सुटणाऱ्या या गाडीला अनुक्रमे जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, टाकरखेडा, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, शिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाळा, तिसी, चौपाले असे थांबे आहेत. दुपारी १.४० वाजता नंदुरबारला पोहोचलेली ही गाडी २.३० वाजता परतीचा प्रवास सुरू करेल.

भुसावळ ते सूरत मार्गावरील या दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करताना भुसावळ ते जळगाव ३०, अमळनेर ४५, नंदुरबार ७५ आणि सूरतपर्यंत १२० रुपये भाडे लागेल. पूर्वी देखील हेच दर कायम होते. त्यात कोणताही बदल झालेला नाही. एक्स्प्रेसने जनरल बाेगीतून प्रवास करता येईल. अर्थात, चाकरमान्यांना दिलासा मिळाला.

बिग ब्रेकिंग : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर न्यायालयात शरण

0
bhr scam sunil zavar

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला. त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले. तर दुसरीकडे जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे. 

सुनील झंवरला दोन मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून बचावासाठी १५ दिवसांचा दिलासा दिला. झंवर याने १५ दिवसांच्या आत पुण्याच्या सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून सुनावणीसाठी मुदत देण्यात आली. तर दुसरीकडे पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत दोघांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढले होते. या वॉरंटची मुदत येणाऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते, असे झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. तत्पूर्वी झंवर याने पाच मार्च रोजी पुण्याच्या न्यायालयात स्वत: हजर राहून वॉरंट रद्द करून घेतले. झंवर याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, दुसरा प्रमुख संशयित अवसायक कंडारेविरुद्धदेखील फरार संदर्भात घोषणापत्र जारी केले आहे. त्याला १४ मार्चपर्यंत न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढलेले आहे. तत्पूर्वी कंडारे याने पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सूरज झंवरने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाली असून, १० मार्चला निकाल आहे. दुसरा संशयित विवेक ठाकरेच्याही जामीन अर्जावर २४ मार्च रोजी निकाल आहे.

पालिकेने गाळेधारकांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावातील सातशे मेडीकल बंद

0
jalgaon market shop association close shop

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । महापालिकेने गाळेधारकांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील औषधी दुकाने आज दुपारी बारापर्यंत बंद होती. यात सुमारे शहरातील सातशे ते आठशे मेडीकल दुकानदारांनी सहभाग नोंदविला.

रुग्णांना औषधीसाठी दूपारपर्यंत वाट पहावी लागली. मात्र अर्जंट असलेली औैषधी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली होती. जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनने हा बंद पाळला होता.

शहरातील १६ मार्केट्स व त्यामधील गाळेधारक आर्थिकरीत्या दुर्बल व मध्यमवर्गीय आहेत. या गाळेधारकांमध्ये ५० ते ६० केमिस्टदेखील आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपजीविका त्या व्यवसायावरच अवलंबून आहे. महापालिकने गाळेधारकांकडे अवाजवी आकारणी केली आहे. एवढी रक्‍कम ते भरू शकत नाही. योग्य रीतसर जी आहे ती ते भरण्यास तयार आहेत. त्यामुळे अन्यायाविरोधात जळगाव शहर मनपा गाळेधारक असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला होता.

अनेक संकुलात मेडीकल दुकाने देखील असून त्यांना आलेले अवाजवी भाडे ते भरू शकत नाही. महापालिकेने गाळा धारकांवर अन्याय करू नये अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, श्यामकांत वाणी, दिनेश मालू, पंकज पाटील, जयेश महाजन, खलीदभाई शेख, ब्रजेश जैन, इरफान सालार, मनीष अत्तरदे, दीपक चौधरी, रवींद्र वराडे, बाळू सोनवणे, समीर गुळवे तसेच सर्व झोनप्रमुख उपस्थित होते.

आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ ।धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या वायरमन तरुणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) असे या तरुणाचे नाव आहे. 

ज्ञानेश्वर चव्हाण हा युवक एरंडोल येथे वीज महावितरण कंपनी त जवळपास ३ वर्षांपासून झिरो वायरमन म्हणुन काम करीत होता. तो जवळपास सात आठ दिवसापूर्वी घरुन निघाला होता.तो आज येईल उद्या येईल म्हणुन आई वडिलांसह घरातील इतर लोक वाट पाहत असताना शनिवारी सकाळी पद्मालय च्या जंगलात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.हे वृत्त कळताच ज्ञानेश्वर च्या आई वडिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.विशेष हे की त्याचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले.त्याने आत्महत्या पाच ते सहा दिवसांपुर्वी केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरल्याची माहिती पद्मालय व गलापुर् येथील ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत कळविले.त्याठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,संदिप सातपुते,अकील मुजावर,जुबेर खाटीक,संदिप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.त्यावेळी गलापूर् चे माजी सरपंच शेख आरिफ पठाण,उपसरपंच पद्मालय अर्जुन मोरे,आबा वाणी यांनी घटनास्थळी पोलिसांना सहकार्य केले.

दरम्यान प्रेत अशा ठिकाणी होते ज्याठिकाणी कोणीही जाऊ शकत नव्हते.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे स्वतः खाली उतरत असताना दरीत कोसळताना बाल बाल वाचले.त्यांना आबा वाणी यांनी सहारा देऊन वाचवले.यावेळी पंचनामा करण्यात आला.मृताच्या खिशात दुचाकीची चावी,मोबाईल,पाकीट व ओळखपत्र मिळुन आले.ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.ज्ञानेश्वर हा अविवाहित होता.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ व बहीण असा परिवार आहे.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर खाटीक व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

भुसावळ नगरपरीषदेची धडक कारवाईत ११ दुकाने सील

0
bhusal

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । भुसावळ नगरपरीषदेने आज मालमत्ता कर व दुकान भाडे थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांची ११ दुकाने सील केली आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ नगरपरिषदेचे भुसावळ शहरात एकूण १२२० संकुले आहेत.यातील थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेतर्फे त्वरित थकबाकी भरण्या संदर्भात सूचना देऊन नोटीस बजविण्यात आल्या होत्या.यानंतरही मोठे थकबाकीदारांची रक्कम अदा न केल्यामुळे आज दिनांक ६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार  यांच्या आदेशाने  शहरातील संतोष चौधरी म्युनिसिपल मार्केट,स्व.छबिलदास चौधरी कपडा मार्केट,बाबा तुळसीदास उदासी मार्केट,छत्रपती शिवाजी मार्केट,महात्मा फुले मार्केट डी.एस.हायस्कुल जवळील असे मार्केट मधून दुकान भाडे ६२,९७७ रोख रक्कम व ०४,०३,२६८ चेकव्दारे तर मालमत्ता कर ५२,२९९ रोख रक्कम व ०१,०५,६५२ चेकव्दारे स्वीकारून एकूण ०६,२४,१९६ एवढी रक्कम मोठे थकबाकीदार यांच्यावर  उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे, संकीर्ण विभाग प्रमुख रामदास म्हस्के,लिपिक – शिपाई गोपाल पाली, मोहन भारंबे, अनिल भाकरे, जय पिंजारी,धर्मेंद्र खरारे अशांनी मिळून वसूल केली.

तर काही थकबाकीदारांनी नगरपरिषदेचा मालमत्ता कर व दुकान भाडे अदा न केल्याने पथकाने पाच मार्केट मधील ११ दुकानांना सील लावले आहे. सदरची कारवाई ३१ मार्च २०२१ च्या पाश्वभूमीच्या आधारे करण्यात येत आहे. तसेच भुसावळ शहरातील इतर थकबाकी व्यापाऱ्यांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी लवकरात- लवकर थकबाकी भरावी असे आवाहन कर वसुली विभागामार्फत करण्यात आले आहे.

काळजी घ्या : आज जळगाव जिल्ह्यात 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत.

जळगाव शहर 334, जळगाव ग्रामीण 30, भुसावळ 38 ,अमळनेर 11, चोपडा 67 ,पाचोरा 02, भडगाव 03, धरणगाव 10,यावल 04, एरंडोल 03, जामनेर 02, रावेर 27, पारोळा 16, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 26, बोदवड 19 आणि इतर जिल्ह्यातील 03 असे एकूण 610 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात 327 रूग्ण बरे झाले असून सध्या 4407 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 64032 इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज 2 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1403 रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीनेपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जळगाव जीएसटी घोटाळा : मुख्य संशयित पिंटू इटकरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
GST-scam

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । जळगाव जीएसटी घोटाळ्याप्रकरणी महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाने जोरदार कारवाई करणे सुरु केले आहे. आज मुख्य संशयित पिंटू इटकरेला नाशिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे अनेक दिगज्जांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहित अशी कि, डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी ही धाड टाकली होती. यावेळी एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले होते. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. डीजीजीआयच्या पथकाने जळगावमधून पिंटू इटकरे या दोघांना ताब्यात घेतले होते.

सूत्रांच्या अंदाजानुसार हा जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात आहे. जवळपास १०० हून अधिक खात्यातून हा व्यवहार झाला असून मुख्यसूत्रधार तथा लाभार्थी जळगावचा असल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी ! जिल्ह्यातील रात्रीच्या संचारबंदीमध्ये १५ मार्चपर्यंत वाढ

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रात्रीच्या संचारबंदीमध्ये वाढ केली आहे.

याची मुदत आता १५ मार्चपर्यंत वाढविली आहे. यासोबत शाळा, कॉलेज, क्लोसेस बंद राहणार आहेत. पूर्वी हे आदेश आजपर्यंत (ता.६) होते. त्याची मुदत पंधरा मार्चपर्यंत वाढविली आहे.

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत अशी संचारबंदी जाहीर केली होती. ही संचारबंदी २२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. यात शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती.

मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे.  यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रात्रीची संचारबंदी १५ मार्चपर्यंत वाढविले असून याबाबतचे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. या कालावधीत जर परीक्षा असतील तर त्या घेता येणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. अभ्यासिका (लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.

-धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन सर्व आठवडेबाजार बंद निदर्शने, मोर्चे, रॅली बाजार समित्यांकडे किरकोळ विक्रेत्यांना बंदी

-सर्व धार्मिक स्थळे एकावेळेस केवळ दहा लोकांच्या मर्यादित उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा यांसारख्या विधीसाठी खुली राहतील.

-कायद्याद्वारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील. तथापि, याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करणे आवश्यक राहील. मात्र जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व जळगाव शहर महापालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सूट राहणार आहे.

-लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करताना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी.