⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

चाळीसगावात मनुष्याचा अर्धवट पंजा आढळल्याने खळबळ

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगरातील कचरा डेपोमध्ये मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये मनुष्याच्या उजव्या पायाचा अर्धवट पंजा पुढील भाग शाबूत असलेला आढळून आला आहे. दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. हा पंजा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे रिपोर्टसह परीक्षणासाठी पाठविण्यात आला. चाळीसगाव शहर पोलिसात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

सुवर्णाताई नगरातील कचरा डेपोमध्ये मानवी पायाचा पंजा जळालेल्या अवस्थेत कसा आला? हा पंजा कुणाचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.

जिल्ह्यासाठी दिलासादायक ; कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर आला 13 टक्क्यांपर्यत खाली

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी याकरीता कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या 8 लाख 92 हजार 80 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पैकी आतापर्यंत (26 एप्रिल) 1 लाख 17 हजार 916 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा 13 टक्क्यांपर्यत खाली आला असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटूंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेही स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.

संशयितांची तपासणी लवकर होऊन त्यांचा अहवाल त्वरीत प्राप्त व्हावा, याकरीता जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर आयोजित करण्यात येत आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती व संशयितांचे स्वॅब तपासण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. संशयितांचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार खाजगी प्रयोगशाळांकडेही अहवाल तपासण्यासाठी पाठविले जातात.

कोरोनाचा साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन 5 ते 10 हजार कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या 8 लाख 92 हजार 80 व्यक्तींच्या कोरोना तपासणीपैकी 6 लाख 21 हजार 750 व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून यापैकी 67 हजार 461 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 2 लाख 70 हजार 330 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून पैकी 50 हजार 455 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच 1 हजार 689 ईतर अहवाल आढळले असून सध्या अवघे 989 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 चे नोडल अधिकारी डॉ एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

त्वरीत निदान, त्वरीत उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरीत नजिकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार खासगी हॉस्पिटलचे निलंबन

0
hospital jalgaon

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जिल्ह्यात कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याती  खासगी रुग्णालयांनाही काेविड रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यात आली होती. मात्र, नियमांचा भंग केल्यामुळे जिल्ह्यातील चार हाॅस्पिटलवर बाॅम्बे नर्सिंग हाेम अॅक्टनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यात भडगाव तालुक्यातील कजगाव, पहूर, भुसावळ व एरंडाेल येथील खासगी हाॅस्पिटलवर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आराेग्याधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.

 

या हॉस्पिटलवर केली प्रशासनाने कारवाई?

एरंडाेल येथील डाॅ. जाहीद शाह यांचे शाह हाॅस्पिटल, भुसावळ येथील डाॅ. ताैसिफ खान यांचे मुस्कान हाॅस्पिटल यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी थेट कारवाई केली आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील डाॅ. निखिल बाेरा यांच्या विघ्नहर्ता हाॅस्पिटल व पहूर येथील डाॅ. सचिन भडांगे यांच्या सिद्धिविनायक हाॅस्पिटलवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे जिल्हा आराेग्याधिकारी यांना दिले आहे. कारण हे दोन्ही हॉस्पिटल जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.

आजचा सोने चांदीचा भाव : २७ एप्रिल २०२१

0
gold rate (2)

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून वाढत असणारा सोन्याचा भाव स्थिर आहे. तीन दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ किंवा घट झालेली नाहीय. चांदी भाव देखील तीन दिवसापासून स्थिर आहे.  सोन्याची खरेदी करण्याची हीच चांगली संधी असून, आगामी काळात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ते प्रति दहा ग्रॅमसाठी ६० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८०२ रुपये झाला आहे. १० ग्रामचा दर ४८,२०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७३ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

यासोबतच १ ग्राम चांदीचा भाव आज ७४ रुपये इतका आहे. १ किलोचा दर ७४,००० रुपये इतका आहे.

कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

जळगावात समाजसेविकेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात मैत्रिणीच्या सासरी तिचा कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी गेलेल्या समाजसेविकेचा विनयभंग केल्याचा प्रकार दि.२५ रोजी घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील समाजसेविका (वय-२५) या दि.२५ रोजी दुपारी १ वाजता मैत्रिणीच्या सासरी त्रिमूर्ती सोसायटी पिंप्राळा येथे तिचा कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी गेलेली होती. वाद सोडविताना मैत्रिणीचे नातेवाईक राकेश राजेश गोटे व भारती राजेश गोटे यांनी समाजसेविकेसोबत वाद घालत शिवीगाळ करून अश्लील वर्तन केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विजय खैरे करीत आहे.

Jalgaon Corona Update : जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी : २६ एप्रिल २०२१

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा रोजच १ हजारांच्या पुढेच येत आहे. आज देखील जिल्ह्यात १ हजार ४८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. समाधानकारक बाब म्हणजे १ हजार १५ लोकांनी कोरोनावर मात देखील केली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दिवसापासून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिर झाली आहे. सोमवारी ७ हजार ६३८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ४८ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १७ हजार ९१६ झाली. दिवसभरात १  हजार १५ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ४ हजार ९०६ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २१ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा २ हजार ९९  झाला आहे.

जळगावात दिलासा

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराला दिलासा मिळाला आहे. सोमवारी शहरात १५९ नवे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे दिवभरात तब्बल २१९ रुग्ण बरे झाले. तर शहरात आज ३ जणांचा मृत्यू झाला.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- १५९, जळगाव ग्रामीण- ५३, भुसावळ-१५७, अमळनेर-७१, चोपडा- ७२, पाचोरा- ५७, भडगाव-१८, धरणगाव- ४२, यावल- ३३, एरंडोल- ११३, जामनेर- ३७, रावेर- ७४, पारोळा- २८, चाळीसगाव- ६६, मुक्ताईनगर- ३७, बोदवड-१५ आणि इतर जिल्हे १६ असे एकुण १०४८ बाधित रूग्ण आढळले आहे.

धानोऱ्यात होम क्वारंटाइन रुग्ण फिरताहेत मोकाट

0
dhanora news

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा परिसरातील अनेक गावात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत सौम्य लक्षणे असलेले होम क्वारनटाईन रुग्ण नियमांचे पालन न करता गावभर मोकाट फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक तीव्र होत आहे. ह्या रुग्णांना गावातील सुज्ञ नागरिक गावात फिरू नका घरीच रहा असे बोलल्यास ते त्यांना अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे ह्या मोकाट फिरणाऱ्या होम क्वारनटाईन रुग्णांना आवरणार तरी कोण असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

 

चोपडा तालुका कोरोनाचा  हॉटस्पॉट झाला आहे. तालुक्यात दररोज बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात बेड कमी असल्याने  सौम्य लक्षणें असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी घरीच राहून गोळ्या औषधे खा व होम क्वारंनटाईन रहा असा सल्ला देत आहेत.

मात्र तरीही काही होम क्वारंनटाईन रुग्ण दूध, किराणा खरेदीचा बहाणा करून मोकाटपणे बाहेर फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत.त्यामुळे ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोकाट फिरणाऱ्या रुग्णांवर चाप लावा

 

होम क्वारंनटाईन रुग्णांनी घरीच विलग राहून उपचार घेणे बंधनकारक आहे. मात्र होम क्वारंनटाईन असलेले व कोविड उपचार केंद्रातून सोडलेले रुग्ण फिरत असताना दिसतात. होम क्वारंनटाईन रुग्ण किंवा कोविड उपचार केंद्रात  उपचार घेऊन आलेल्या रुग्णांनी पुढील काही दिवस घरी विलगिकरण रहाणे आवश्यक आहे. पोलिसांनी व ग्रामपंचायत प्रशासने मोकाट फिरणाऱ्या रुग्णांना चाप लावावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.

 

 

रुग्णामुळे संसर्गाचा धोका वाढला

 

कोरोना संसर्गाची लाट तीव्र होत असताना होम क्वारनटाईन असलेले रुग्ण मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या रुग्णामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रात्र दिवस कोरोना रुग्णांसाठी झटत आहेत. मात्र कोरोना संसर्ग झालेले रुग्ण विनाकारण फिरत असून संसर्ग वाढवत आहे. 

 

 

सहकार्याची अपेक्षा

 

धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १८ गावे व वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. आरोग्य केंद्रात दररोज रॅपिड टेस्ट  करणे सुरूच आहे. यादरम्यान सौम्य लक्षणे असलेले रुग्णांना होम क्वारनटाईन केले जाते. आरोग्य विभागात कोरोना महामारीमुळे रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांना क्वारनटाईन रुग्ण बाहेर फिरत आहे की घरीच विलगिकरण आहे याबाबत लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे संबंधित रुग्णांनी आरोग्य विभागास सहकार्य करणेही अपेक्षित असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कवडीवाले यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.

 

 

 

कोविड उपचार केंद्रातून उपचार घेऊन आलेल्या रुग्णांनी पुढील १४ दिवस घरी विलगीकरण रहाणे आवश्यक आहे. तसेच होम क्वारनटाईन रुग्णांनी घरीच विलग राहून उपचार घेणे बंधनकारक आहे. मात्र हे रुग्ण फिरत आहेत या रुग्णामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रात्र दिवस कोरोना रुग्णांसाठी झटत आहेत.  यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करणे गरजेचे आहे.

 डॉ. उमेश कवडीवाले,
वैद्यकीय अधिकारी,  प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा

 

गावातील होम क्वारंटाइन असलेले  

कोरोना संसर्ग झालेले रुग्ण विनाकारण गावभर फिरून संसर्ग वाढवत असतील तर बाधित रुग्णांची माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवावी आम्ही त्यांच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई करु.

 

विजय चौधरी, उपसरपंच धानोरा

१० लाखांसाठी पोलिसाकडून पत्नीचा छळ ; ५ जणांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या विवाहितेने मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर परिसरात असलेल्या शंकर आप्पा नगरातील ३० वर्षीय विवाहिता अश्विनी पाटील यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांचे पती महेंद्र भगवान पाटील हे कुर्ला पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.

लग्नानंतर माहेरून मुंबई येथे घर घेण्यासाठी १० लाख रुपये आणावे म्हणून पती महेंद्र भगवान पाटील यांच्यासह सरलाबाई पाटील, दीपक पाटील, उज्ज्वला दीपक पाटील व मनीषा संजय बोरसे यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील हे करीत आहे.

उद्धव ठाकरे सरकार लपवाछपवी खेळतंय : गिरीश महाजनांची टीका

0
girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी कोरोनाची चाचणी असेल, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी चालली आहे, अशा शब्दांत भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी टीका करत राज्य शासनाला लक्ष्य केले.

आज दि. २६ एप्रिल रोजी आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कोरोनाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाही. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजनांनी केला.लोकांनी आता करावे तरी काय..?ग्रामीण भागातील भीषण परिस्थितीकडेही गिरीश महाजन यांनी लक्ष वेधले. राज्यात कोरोनामुळे खूपच वाईट परिस्थिती आहे. विशेष करून ग्रामीण भागातील परिस्थिती विदारक आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिवीर व ऑक्सिजन मिळत आहे.

रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल 12 ते 14 दिवस येत नाहीत. हे सारे चित्र गंभीर आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात आता तापमान वाढले आहे. अशा स्थितीत ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये विजेचा प्रश्न आहे. रुग्णांसाठी पंखे नाहीत. शासनाने जनरेटर पाठवले, पण ते इन्स्टॉल झालेले नाहीत. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात खूप मोठी आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन अजूनही शासनाने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आ. महाजन यांनी राज्य सरकार हे वसुलीबाज असल्याची टीका केली. ते म्हणाले की, एखादा जबाबदार अधिकारी हा थेट गृहमंत्र्यांवर आरोप करत असल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. यामुळे हे सरकार वसुलीचे काम करत असल्याचा आराप आ. महाजन यांनी याप्रसंगी केला.