⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

दिलासादायक : सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना आज सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आज ११९४ नवीन रुग्ण आढळून आले असून १२२४ रुग्ण आज बरे झाले आहेत.

आज जळगाव शहर २३२, जळगाव तालुका २६, भुसावळ ३६, अमळनेर १०७; चोपडा २००; पाचोरा ४२; भडगाव ३४; धरणगाव ९०; यावल २२; एरंडोल ४२, जामनेर ८९; रावेर १३, पारोळा १७; चाळीसगाव ५१, मुक्ताईनगर ७३; बोदवड ८ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे ११९४ रूग्ण आढळून आले आहेत.

 

रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील सरकारी व खासगी कोवीड उपचार केंद्रात प्राधान्याने रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे आदेश आरोग्य विभागाकडूनच आले आहेत. त्यानुसार जळगाव शहरातही सरकारी व खासगी केंद्रात आजपासून नियमित पुरवठा सुरू झाला. मात्र या सोबतच उपलब्धतेनुसार औषध विक्रेत्यांनाही रेमडेसिवीर देण्याच्या सूचना आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिली.

रेमडेसिवीर पुरवठा करताना सरकारी व खासगी उपचार केंद्राला प्राधान्य दिल्याच्या आदेशाची आज सर्वत्र चर्चा होती. मी सुद्धा याविषयावर लेखन केले होते. आजच्या आदेशामुळे औषध विक्रेत्यांना रेमडेसिवीर मिळणार नाही असे चित्र निर्माण झाले होते. त्याविषयी श्री. राऊत यांना विचारले असता त्यांनी सविस्तर आदेश समोर ठेवले. या आदेशात म्हटले आहे की, आरोग्य विभागाने गरजेची औषधे व इंजेक्शन याची साठेबाजी रोखणे आणि वाढीव किमतीतून नफेखोरी रोखणे यासाठी सक्तीच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन हे प्राधान्याने सरकारी कोवीड उपचार केंद्र, जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोवीड उपचारासाठी मान्यता दिलेले खासगी हॉस्पिटल यांना पुरवठा करावे. याशिवाय अधिकतम साठा असल्यास तो औषध विक्रेत्यांना पुरेशा प्रमाणात विभागून द्यावा. हे करण्यामागे प्रशासनाचा हेतू गरजू सर्व रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे हाच आहे.

या आदेशात रेमडेसिवीरच्या किमतीबाबतही मर्यादा घातल्याचे श्री. राऊत यांनी लक्षात आणून दिले. रेमडेसिवीरची विक्री छापील एमआरपीने न करता खरेदीची किंमत अधिक १० टक्के कमिशन अधिक आवश्यक तो कर घेऊन करावी. म्हणजेच जळगाव शहरात रेमडेसिवीर हे इंजेक्शन एमआरपी पेक्षा कमी किमतीत विक्री झाले पाहिजे. हेच दर रुग्णाच्या बिलातही आकारले गेले पाहिजेत. कमी किमतीत रेमडेसिवीर विकत घेऊन रुग्णाला जादा किमतीत आकारणी करणाऱ्यावरही दंडनिय कारवाई केली जाणार आहे. कोवीड रुग्णांच्या बिलांची तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. तेथेही अशा बिलांची तपासणी होणार आहे. रुग्णांची बिले सरकार निर्धारित किमतीतच हवी. ती जास्त असली तर खपवून घेणार नाही असाही इशारा श्री. राऊत यांनी दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘पीजी’ कोर्स मान्यतेसाठी समितीची पाहणी

0
GMC Jalgaon Recruitment 2022

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जनऔषध वैद्यकशास्त्र, विकृतीशास्त्र,  शल्यचिकित्साशास्त्र विभागात स्थानिक चौकशी समितीने शनिवारी ३ एप्रिल रोजी भेट दिली. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी मान्यतेच्या कामास्तव निरीक्षणाची कार्यवाही समितीने पूर्ण केली. नंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थांचे निरीक्षण होईल. आगामी काळात परवानगी मिळाली तर पुढील शैक्षणिक वर्षाला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होतील. 

जनऔषधवैद्यक शास्त्र, विकृतीशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र विभागात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यताच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रत्येकी एक सदस्यीय समिती नेमली होती. यात जनऔषधवैद्यक शास्त्रकरिता ९ प्रवेश क्षमता तर विकृतीशास्त्र विभागासाठी ७, शल्यचिकित्सा ७  प्रवेश क्षमता मान्य झाली आहे.

सकाळी ९ वाजता या समितीने महाविद्यालयात पाहणी केली. जनऔषधवैद्यक शास्त्र विभागात समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप ढेकळे (डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) यांनी विभागाच्या प्रमुख डॉ. बिना कुरील यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. तसेच अभ्यासक्रम मान्यतेसाठी चौकशी करून कागदपत्रे तपासत प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी विभागातील डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साझी  उपस्थित होते.

विकृतीशास्त्र विभागात समितीचे अध्यक्ष डॉ. अनघा चोपडे  (डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) यांनी पाहणी केली. विभाग प्रमुख डॉ. शैला पुराणिक यांनी विभागाविषयी माहिती सांगितली. तसेच अभ्यासक्रम मान्यतेच्या कामास्तव लागणारी कार्यवाही डॉ. चोपडे यांनी पूर्ण केली. या विभागात ७ विद्यार्थी प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली आहे. यावेळी विभागात डॉ. भारत घोडके, डॉ. मनोज पाटील, डॉ. प्रदीप माले, डॉ. अहिल्या धडस यावेळी उपस्थित होते.

शल्यचिकित्सा शास्त्र विभागात डॉ. शिवाजी साधुलवाड (डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय) यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी विभाग प्रमुख डॉ मारोती पोटे यांनी त्यांना विभागाची सर्व माहिती दिली.  अभ्यासक्रमाच्या मान्यतेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्यांनी पाहिली व समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ.संगीता गावित,  डॉ. प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.

पाहणी झाल्यावर समिती अध्यक्षांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. रामानंद यांनी त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

विनामुल्य कोविड-१९ तपासणी शिबिर संपन्न

0
free covid 19 cheking

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । शहरातील शिव कॉलनीत -श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर गट न.60 येथे आज शनिवारी कोरोनाचे वाढते पेशंट पाहता मोफत कोरोना 19 विषाणूची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. सर्दी, खोकला, ताप किंव्हा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा नागरिकांनी टेस्ट करून घेतली. 

यावेळी मनपा प्रभाग समिती सदस्य रवींद्र (बंटी) नेरपगारे, गणपती मंदिर अध्यक्ष डॉ.सुरेश राणे,मनपा कनिष्ठ अभियंता योगेश वाणी,स्टाफ नर्स कामिनी इसागळे, परिचारिका रिना बारेला, सुनीता मुंडे,आशा वर्कर सुचिता बाविस्कर, लता रायसिंग, ल्याब टेक्निशियन संकेत सोनवणे, शामराव सोनगीर,तुकाराम पाटील, दिनकर पाटील यांचे सहकार्य लाभले.

मनपातील सत्ताधाऱ्यांनी जळगावकरांना वाऱ्यावर सोडले : राजेंद्र घुगे-पाटील

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत असून शहर मनपातील सत्ताधाऱ्यांनी जळगावकरांना वाऱ्यावर सोडले आहे. 

दोन दिवसापूर्वी झालेल्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या सभेत आरोग्यासाठी केलेली १५ कोटींची तरतूद कमी करून नगण्य स्वरूपात करायला लावली. मनपावर कर्ज जसेच्या तसे आहे असे सत्ताधारी म्हणतात. मला वाटते एकतर सत्ताधाऱ्यांना त्यातील कळत नाही किंवा ते न कळण्याचे ढोंग करीत आहे असा टोला स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 यावेळी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक साखरे उपस्थित होते.

पहा व्हिडीओ : 

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/356482289047388/

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीनचे लोकार्पण

0
rotary club of jalgaon east

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी म्हणून रोटरी क्लब जळगाव इस्टने 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन शनिवार ३ मार्च पासून तत्काळ उपलब्ध करून दिले आहे. 

जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टने कोरोना आजाराचा वाढता व्याप  पाहता तत्काळ 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर खरेदी करून जनसेवेत उपलब्ध केले आहे. जळगाव शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे. जे  कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते अशा रुग्णांना हे काँसंट्रेटर मिळू शकणार आहे. यावेळी जळगाव जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, रोटरी उपप्रान्तपाल अपर्णा मकासरे, डॉ जगमोहन छाबडा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

याप्रसंगी अध्यक्ष भावेश शाह, सचिव हितेश मोतिरमानी, मेडिकल प्रमुख डॉ. राहुल भन्साली, संजय गांधी, संजय शाह, संजय भंडारी, विजय लाठी, गोविंद वर्मा, सचिन खडके, शरद जोशी आदी उपस्थित होते. 

यासाठी रोटरी क्लबने ४ सम्पर्क मोबाईल क्रमांक जारी केले आहे. यात अध्यक्ष भावेश शाह (९४२१९७४६६१), डॉ. जगमोहन छाबडा (९८९००३४९००), डॉ. राहुल भन्साली (९४२२२७८१५७), सचिन खडके (९९२२२४३५९८, ०२५७- २२२०४६८) यांच्याशी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे करण्यात आले आहे.

जळगाव शहरात बेशिस्त हॉकर्सवर मनपाची धडक कारवाई

0
atikraman 1

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । शहरात ठीकठिकाणी बाजार भरविला जातो. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही हॉकर्स बेशिस्तपणे उभे असतात. शनिवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण पथकाने सुभाष चौक, बळीराम पेठ, शनिपेठ, महात्मा फुले मार्केटमध्ये हॉकर्सवर कारवाई केली.

atikraman

मनपाच्या अतिक्रमण पथकाने लोटगाड्या, दुचाकी तसेच इतर साहित्य जप्त केले. भिलपुरा परिसरातील मरीमाता मंदिराजवळ असलेल्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी उपायुक्तांनी सूचना केल्या आहे.

बुलेटच्या अनधिकृत सायलेन्सरवर फिरवले ‘रोड रोलर’

0
police action against bulltet

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । शहरात भरधाव वेगात बुलेट दुचाकी पळवून मोठया आवाजाचे सायलेन्सर लावून फिरत असलेल्या १७ बुलेट वाहनावर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. शनिवारी वाहतूक शाखेकडून जप्त केलेल्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरविण्यात आले.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर यांनी शहरात बुलेट चालकांवर कारवाईची मोहीम राबवली.

बुलेट मोटरचालक हे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावतात त्यामुळे शांतता झोन असलेल्या ठिकाणी ध्वनी प्रदुषण होवून शातता भंग होत असते. जळगाव शहरातील टॉवर चौक, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक मार्गावर मोठे हॉस्पीटल, शाळा, कॉलेज, सार्वजनिक बँक, महत्वाचे शासकीय कार्यालय असून अशा ठिकाणी कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होत असते. तसेच बुलेट गाड्यांना कर्कश हॉर्न लावून मोठ मोठयाने आवाज करत जळगाव शहरात फिरत असतात. वेगळ्या सायलेन्सरचे प्रकार ढोलकी सायलेन्सर, पंजाब सायलेन्सर, डॉलफिन सायलेन्सर अशी असून या सायलेन्सरमुळे कर्कश आवाज, फटाके फुटल्यावर होणारा आवाज असे ध्वनी निघतात.

शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर, पोउपनिरी कैलाससिंग पाटील व शहर वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार यांचे मार्फत तरी अशा बेशिस्त बुलेट मोटर सायकल वाहन चालकाविरुद्ध धडक कारवाई करून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच मॉडिफाय केलेले सायलेन्सर काढून कंपनीने दिलेले सायलेन्सर लावण्यात आलेले आहे व मोडीफाय सायलेन्ससर शहर वाहतुक शाखेत येथे जमा करण्यात आले.

पहा व्हिडीओ : 

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/461299885136899/

२२ हजार दंड वसूल

शहर वाहतुक शाखा येथे एकूण १७ बुलेट जमा करण्यात आल्या असून विविध प्रकारचे सायलेन्सर लावलेल्या बुलेट जसे डॉलफिन सायलेन्सर लावलेल्या ५ बुलेट, शार्पतुत सायलेन्सर लावलेली ३ बुलेट, पंजाब २ बुलेट, शार्ट पंजाब ३ बुलेट, इंदोरी २ बुलेट, ढोलकी सायलेन्सर लावेलेले २ बुलेट अशा एकूण १७ बुलेटवर कारवाई करून सायलेन्सर जमा केले आहेत. बुलेट वाहनाच्या मुळ संरचनेमध्ये बदल करणे व प्रेशर हॉर्न इ. बाबत केसेस करून दंड वसुल करण्यात आला आहे मो वा कायदा कलम ५२/१९१ MVA B CMVR ११५/२)/१७७ MVA अंतर्गत २२०००/- रु दंड वसुल केला असून सर्व अनधिकृत बुलेट सायलेन्सर रस्त्यावर रोलर खाली ठेवून स्क्रॅप करण्यात आलेले आहे.

पाकिस्तानात केळी निर्यातीची परवानगी द्या; खासदार रक्षा खडसेंची कृषिमंत्र्यांकडे मागणी

0
raksha khadse banana export

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील केळीला पाकिस्तानात निर्यात करण्याची परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना दिले आहे.

सध्या इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, अझरबैजान कुवैत आदी देशांत जळगावची केळी ही निर्यात होते आहे. इतर देशांतील मागणी पाहता पाकिस्तानी बाजारपेठांमधूनही जळगावच्या केळीला मागणी येत आहे. त्यामुळे जळगावातील शेतकऱ्यांना पाकिस्तानात केळी निर्यात करण्याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन दिले आहे. याबाबत तोमर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

भारत व पाकिस्तान देशातील तणावामुळे पाकिस्तानसोबत व्यापाराला कमी प्राधान्य दिले जात होते. परंतु भारत पाकिस्तानच्या व्यापाराचे व्यवहार आता पूर्ववत होत असून भारतातून कापूस आणि इतर शेतकी उत्पादन सुरळीत निर्यात होऊ लागले आहेत. या अनुषंगाने केळी फळपीक पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत कृषी मंत्र्यांनासोबत खासदारांनी सकारात्मक चर्चा केली. पाकिस्तानात केळी निर्यातीस मंजुरी मिळाल्यास बारामाही केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण होऊन पाकिस्तानसोबत व्यापाराचे संबंध दृढ होऊ शकतात. छोट्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही केळी निर्यातीच्या माध्यमातून अनेक संधी निर्माण होणार आहेत.

केळी फळपिक लवकरच पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सकारात्मकता दर्शविलेली आहे. त्यामुळे जळगावची केळी ही पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी भारतीय दूतावास सकारात्मकता दर्शवून जळगाव जिल्ह्यातील केळी फळपीक पाकिस्तानात निर्यातीबाबत सकारात्मकता दर्शवेल असा  खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.