⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

थांबता गोंधळ थांबेना : लस न घेताच वॅक्सीनेशन पूर्ण झाल्याचा आला मेसेज

0
vaccination

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । कोरोनाचा तांडव दिवसेंदिवस वाढत असून देखील प्रशासकीय प्रणालीमधील गोंधळ कमी होत नाहीये. यात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. यात भर म्हणजे भुसावळातील एका दाम्पत्यास कोरोनाची लस न घेताच ‌वॅक्सीनेशन पूर्णचा एसएमएस आला.

यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय गलथानपणा समोर आला आहे. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफ खान यांनी दाम्पत्याचे लसीकरण करुन घेतले. या नवनवीन घटनांमुळे नागिरकांमधून रोष व्यक्त असून यामुळे संभ्रमाचे वातावरण वाढत आहे.

वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी एस.पी.पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १३ मार्चला कोविन अ‍ॅपवर नोंदणी करुन लसीकरणासाठी ५ एप्रिल रोजीची वेळ नोंदवली होती. सोमवारी रुग्णालयात गेले. परंतु, तेथील लसीकरण बंद झाल्याने त्यांना महात्मा फुले आरोग्य केंद्र, वेडीमाता मंदिर भागात पाठवण्यात आले.

महात्मा फुले आरोग्य केंद्रावर आले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचेकडे कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट मागितला. त्यामुळे ते अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यासाठी निघून गेले. यानंतर काही वेळातच त्यांना कोविन अ‍ॅपवरुन लसीकरण पूर्ण झाल्याचा  असा मेसेज आला. त्यामुळे पाटील दाम्पत्याने पुन्हा महात्मा फुले केंद्र गाठले. तेथे डॉ. तौसिफ खान यांनी त्यांना लस दिली.

सोन्याच्या भावात मोठी घसरण… घ्यायचं असेल तर घेऊन घ्या…

0
gold rate

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण सुरु आहे. पाडव्याच्या आधीच सोन्याचा भाव पुन्हा एकदा गडगडला आहे. येत्या महिन्यात अनेकांच्या घरात लग्नाचे शुभकार्य राहणार आहे. त्यामुळे सोन खरेदी करण्यासाठी सध्या चांगली संधी चालून आली आहे.

आज जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्राम ४३,३५० इतका असून तो कालपेक्षा चक्क १७० रुपयांनी कमी आहे. जळगावची ओळख असणाऱ्या २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ४५,५२० इतका असून तो १८ रुपयांनी कमी झाला आहे.

याउलट चांदीच्या भावात तेजी असून १ किलो चांदीचा भाव ६९,००० रुपये असून तो कालपेक्षा २०० रुपयांनी वाढला आहे.

नेरीनाका स्मशानभूमी आता २४ तास राहणार खुली राहणार

0
neri naka smashan bhumi

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील नेरीनाका येथील स्मशानभूमी केवळ दिवसा सुरु राहत असून रात्री ८-९ नंतर बंद राहत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात सातत्याने येत होत्या. याविषयी विविध माध्यमातून बातम्या आल्यानंतर आता हि स्मशानभूमी २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आता १० दिवसांपूर्वी २५ मार्चला रात्री ११ वाजेपर्यंत स्मशानभूमी प्रवेशद्वारावर नातेवाईक मृतदेह घेऊन आले होते. परंतु, स्मशानभूमी कुलूपबंद होती. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे फोन लागत नव्हते. नातेवाइकांनी अनेक लोकप्रतिनिधींना फोन केले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे मृतदेह पुन्हा रुग्णालयात नेण्याची वेळ नातेवाइकांवर आली होती.

यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून राजू कोल्हे व महेंद्र पाटील या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. हे दोन्ही कर्मचारी रात्रभर स्मशानभूमीत थांबून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहेत.

पाण्याची मोटार चोरणारा काही तासात जेरबंद

0
shankar sabane

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या लाकूड पेठेतील मार्बल टाईपच्या दुकानातून पत्र्याच्या शेड उचकावून पाण्याची मोटर चोरून नेल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले आहे.

शिवाजीनगरात राहणारे हितेंद्र हिराबाई पटेल यांचे लाकूड भेटीत ग्रॅनाईट मार्बलचे दुकान आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले रविवारी दुकान बंद असल्याने सोमवारी सकाळी नऊ वाजता त्यांनी दुकान उघडले असता दुकानातील पाण्याची मोटार त्यांना दिसून आली नाही त्यांनी दुकानात शोध घेतला असता दुकानाच्या शेडचे पत्रे कुणीतरी वाकलेले दिसून आले मोटार चोरी झाली असल्याची खात्री झाल्याने पटेल यांनी दुपारी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी अक्रम शेख, भास्कर ठाकरे व प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने अवघ्या काही तासात शंकर विश्वनाथ साबणे वय-१८ चोरट्याला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.

रेमिडीसिव्हरसाठी भाजप आमदार आपला निधी सरकारला देण्यास तयार

0
bjp remedisaver

जळगाव लाईव्ह न्यूज । ५एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात पुरेसे व्हेन्टीलेटर, ऑक्सिजन बेड, उपचारासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य तसेच रेमिडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.

यामुळे जळगाव जिल्ह्याची सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार मिळून रेमिडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी शासनाला आमदार निधी देण्यास तयार आहे. जेणेकरून रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होणार नाही व जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. यासाठी भारतीय जनता पक्ष तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा), खा.रक्षा खडसे, खा.उन्मेश पाटील, आ. संजय सावकारे, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प. सभापती जयपाल बोदर्डे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा सरचिटणीस मधुकर काटे, सचिन पान पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, आरिफ शेख व भाजपा जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा… आता ‘या’ ५ सेवांचा देखील आवश्यक सेवांमध्ये समावेश…

0
lockdown

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । काल ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले .

आता या सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील:

  1. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
  2. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
  3. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा
  4. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
  5. फळविक्रेते

खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणार्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.

ह्या खासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत:

  • सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स
  • रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,
  • सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,
  • सर्व मायक्रो फायनान्स संस्था
  • सर्व वकिलांची कार्यालये
  • कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)

ज्या व्यक्ती रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ तर सकाळी ७ या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.

एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.

परीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री ८ नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.

घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री ८ नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.

जळगाव जिल्ह्यातील आजची कोरोनाची सविस्तर माहिती वाचा इथे

0
corona (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज ११८२ नवीन रुग्ण आढळून आले असून १०९० रुग्ण बरे झाले आहेत. १५ जणांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला असून जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी दार ८५.९१% इतका आहे.

आज जळगाव शहर ३२३, जळगाव तालुका १०२, भुसावळ ६०, अमळनेर १११; चोपडा २२४; पाचोरा १६; भडगाव ०३; धरणगाव ३९; यावल ६३; एरंडोल ३८, जामनेर २४; रावेर ६३, पारोळा ०२; चाळीसगाव ०२, मुक्ताईनगर६३; बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील १४ असे ११८२ रूग्ण आढळून आले आहेत.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
anil deshmukh resigns feedback on girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या आरोपावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीचा आदेश होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.  दरम्यान, देशमुखांच्या राजीनाम्यावरून भाजपचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे. अजून पुढे बघा…काय होते ते ? असे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.

खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. एका साध्या एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी केली होती. मात्र निगरगट्ट ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. तथापि, कोर्टाच्या दणक्याने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनाच्या टोकाप्रमाणे आहे. म्हणजेच अजून बरेच काही समोर येणार आहे. या मंडळीने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे. अजून पुढे बघा…काय होते ते ? असे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी राज्य शासनाने पारित केलेल्या नियमावलीची जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरानाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. त्याचबरोबर रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी. रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. रेमडेसिविरचा साठा पुरेसा ठेवावा. रुगणालयांमध्ये पुरेशे व्हेटिलेटर रहातील याचे नियोजन करावे. अत्यावश्यक सेवेतील नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घेताना विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

यावेळी कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याबरोबरच रुग्णांना रुग्णालयांची बील देणे आवश्यक असून चोपडा येथे तातडीने व्हेटीलेटर उपलब्ध करण्याची सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी केली. तर कंटेमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांचे सहकार्य महत्वाचे आहे. याकरीता नागरीकांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले तर संजय सावकारे यांनी बाधित रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी भुसावळ येथील रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घेण्याची सूचना केली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी रात्रीच्यावेळी सुरु रहावी याकरीता महानगरपालिकेने आवश्यक ते नियेाजन करण्याची सूचना आमदार सुरेश भोळे यांनी केली तर जिल्ह्यात शासनाच्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास लॉकडाऊन करावा तसेच कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेत भितीचे वातावरण आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील दोन/ तीन दिवस रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. आता मुलबक साठा असून अजून इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचे आवश्यक ते सहकार्य मिळत असून जिल्हावासियांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केले. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलीस प्रभारींना दिल्या असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.