⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया; म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या आरोपावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीचा आदेश होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.  दरम्यान, देशमुखांच्या राजीनाम्यावरून भाजपचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे. अजून पुढे बघा…काय होते ते ? असे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.

खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. एका साध्या एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी केली होती. मात्र निगरगट्ट ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. तथापि, कोर्टाच्या दणक्याने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनाच्या टोकाप्रमाणे आहे. म्हणजेच अजून बरेच काही समोर येणार आहे. या मंडळीने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे. अजून पुढे बघा…काय होते ते ? असे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.