⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

कोरोनाबाधित गर्भवती महिलेला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश

0
jalgaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात केवळ दीड हिमोग्लोबिन असलेल्या तसेच चार आजारांनी ग्रस्त असलेल्या २५ वर्षीय कोरोनाबाधित गर्भवती महिलेला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. तिच्या पोटातील अडीच महिन्यांचा मृत गर्भदेखील काढण्यात आला आहे. शुक्रवारी १४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत महिलेला साडी, गुळ-शेंगदाने चिक्की, आंबे भेट देऊन अनोखा व अविस्मरणीय निरोप देण्यात आला.

बोदवड येथील एका पानटपरी चालकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यात त्यांच्या २५ वर्षीय पत्नीला हाडांचा ठिसूळपणा, रोगप्रतिकारकशक्तीशी संबंधित एसएलई, रक्तक्षय, थॅलेसेमिया अशी आजार जडलेली आहेत. या आजारांवर मुंबईत देखील उपचार सुरु आहे. सध्या कोरोनाच्या काळात मुंबईला जाणे शक्य न झाल्याने या महिलेला उपचार घेणे थांबलेले होते. ती अडीच महिन्यांची गर्भवती देखील होती. अशातच तिचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बोदवड ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात होते. ३ मे रोजी महिलेचे हिमोग्लोबिन कमी होऊन प्रकृती गंभीर झाली, त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र  विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या टीमने उपचार सुरु केले. तपासणी केल्यावर तिचे हिमोग्लोबिन दीड एचबी निघाले. तिला उभे राहता येणे अशक्य झाले होते. ऑक्सिजन स्थिती ८० होती. श्वासोच्छ्वासाचा वेग जास्त असल्याने धाप लागत होती. गंभीर अवस्थेत ती दाखल झाली. वाचण्याची शक्यता कमी होती.

डॉक्टरांनी उपचार सुरू केले. महिलेला रक्ताच्या सहा पिशव्या लावाव्या लागल्या. अतिदक्षता विभागात दाखल करून तिची स्थिती नियंत्रणात आणली. तसेच,पोटातील गर्भाचीदेखील तपासणी केल्यानंतर तो अडीच महिन्याचा  मृत असल्याचे दिसले. त्यामुळे हा गर्भ सुरक्षित पद्धतीने काढून टाकण्यात आला. आता या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिला पुढील २ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर शुक्रवारी १४ रोजी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते सदर महिलेला साडी, गुळाची चिक्की आणि आखाजीनिमित्त आंबे भेट देत तिला सन्मानाने व अविस्मरणीय असा निरोप देण्यात आला. प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. संदीप पटेल, विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे उपस्थित होते.

महिलेवर यशस्वी उपचार करणेकामी डॉ.संजय बनसोडे यांच्यासह डॉ. रोहन केळकर, डॉ. शीतल ताटे, डॉ. सुधीर पवनकर, डॉ. राजश्री येसगे, डॉ. प्रियांका शेटे, अधिपरिचारिका विमल चौधरी,  राजश्री अढाळे यांनी परिश्रम घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रुग्णांच्या  गुंतागुंतीच्या प्रकरणांवर यशस्वी उपचार होत असल्याने रुग्णांचा दाखल होण्याचा कल वाढत आहे.

महिलेच्या पर्समधून मेडिकल बिल तसेच जेवणासाठी आणलेले १५ हजार लांबवले

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । रुग्णालयात दाखल असलेल्या पतीस पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांने १५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडलीय.  याबाबत शहर पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील रहिवासी अलका लोणे व त्यांचे पती मधूकर लोणे दोघाना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जळगावातील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांना मेडिकल बिलाकरीता साडे बारा हजार व जेवणाच्या डब्यासाठी अडीच हजार रूपये असे त्यांच्या मुलीने आई अलका लोणे यांच्याकडे दिले होते. ते पैसे अलका यांनी पर्समध्ये ठेवले होते.

दरम्यान, गुरूवार, १२ मे रोजी पती मधूकर यांनी जेवण केले की नाही, याची विचारपूस करण्यासाठी अलका हया आयसीयू रूममध्ये गेल्या, तेवढयात त्यांच्या पर्समधील पंधरा हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरटयाने चोरून नेली. पाच ते सहा मिनिटानंतर त्या त्यांच्या जागेवर आल्या असता, त्यांना पर्समधील रोकड गायब झालेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच मुलगी युवती हिला सांगितला व डॉक्टरांना सुध्दा घटना कळविली. अखेर युवती राहुल पाटील यांनी गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्‍यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । आद्य समाजसुधारक, समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज विनम्र अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राऊत यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळून दुचाकी लंपास

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबतच नसून दररोज नवनवीन चोरटे एलसीबीच्या तावडीत सापडत असले तरी स्थानिक पोलीस स्टेशनवाले अद्यापही चोरांचाच शोध घेत आहे. दोन दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास झाल्यानंतर काल चक्क एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणाहून दुचाकी लंपास करण्यात आली आहे.

ममुराबाद येथील मनु तुकाराम बोरासे वय-३२ हे एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या लिग्रँड कंपनीत वायरमन म्हणून काम करतात. दि.१२ रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.एझेड.९५९७ ही लिग्रँड कंपनीबाहेरील पार्किंगला लावली आणि ते कामाला गेले. दुपारी ५ वाजता ते बाहेर आले असता दुचाकी दिसून आली नाही.

जवळपासच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता दुचाकी मिळून न आल्याने ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची त्यांची खात्री पटली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा फटका : अक्षय्य तृतीयेला जळगावातील सुवर्णबाजार ठप्प, १०० कोटीचा फटका?

0
gold

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या दिवशी बहुतांश जण सोने खरेदी करतात. या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते, असे म्हटले जाते. परंतु राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून यामुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफा बाजाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या सराफ बाजारात एक रुपयाचीही उलाढाल होणार नाही. अशा परिस्थितीत सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत. साधारणपणे 100 कोटींची उलाढाल दरवर्षी या मुहूर्तावर होत असते.

अक्षय्य तृतीयेला ‘सुवर्णनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ बाजारात दरवर्षी या सणाच्या दिवशी सोने खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण, गेल्या वर्षी कोरोनामुळे अक्षय्य तृतीयेला सराफ बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहारच होऊ शकले नव्हते. यावर्षी देखील कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध घोषित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सराफ बाजारातील सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या एक रुपयांचीही उलाढाल होऊ शकणार नाही.

जळगाव शहरात सुमारे 125 ते 150 तर संपूर्ण जिल्ह्यात दीड हजार सराफ व्यापारी आहेत. या सर्वांना कडक निर्बंधाचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सराफ व्यावसायिकांची स्थिती बिकट आहे. अशाही परिस्थितीत व्यापाऱ्यांना इतर खर्च सुटलेले नाहीत.

आजचा सोन्याचा दर

दरम्यान, आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 44 हजार 720 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 45 हजार 720 रुपये इतका आहे. तर दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45 हजार 900 इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 49 हजार 900 इतका आहे.

पाचोऱ्यात ईद आणि आखाजी सण साध्या पद्धतीने साजरी

0
pachora

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । पाचोरा शहारात आज 14 मे रोजी ईद आणि आखाजी सध्या आणि सुरक्षित पद्धतीने साजरी केली. चेहऱ्याला मास्क आणि फक्त दोन चार लोकांमध्ये साजरी केली.

तसेच आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठेत कमीत कमी नागरिक ईद आणि खाजीची खरेदी करताना दिसलें सामाजिक दुरी आणि जास्त गर्दी न करता हे दोघं सण साजरे करण्यात आले. पाचोरा शहरातील लहासीलदार कैलास चावडे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की आखाजी तथा ईद सध्या व सुरक्षित पद्धतीने आपल्या परिवारा सोबत साजरी करा तसेच नागरिकांनी टेकनॉलॉजि चा वापर करून एक दुसऱ्याला शुभेच्छा दिल्या.जळगाव लाईव्ह तर्फे सर्व मुस्लिम -हिंदू बांधवाना ईद आणि आखाजीच्या शुभेच्छा आणि सामाजिक दुरी ठेऊन साजरी करा.

जळगावकरांनो टेन्शन घेऊ नका : जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर पोहचला

0
oxigen in jalgaon civil

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टॅंक सायंकाळी ७.३० वाजता रिकामा झाला होता. प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था सुरू करून ऑक्सिजन पुरवठा कार्यान्वित ठेवला होता. दरम्यान, ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर मध्यरात्री १२.४२ वाजता पोहचला असून टॅंक पुन्हा भरण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रूग्णांना पुढील १८ ते २४ तास पुरेल इतका ऑक्सीजन साठ्याची तरतुद प्रशासनाने करून ठेवली होती. ऑक्सिजन पुरेसा असल्याने रूग्ण, नातेवाईक यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली होती.

मध्यरात्री ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर पोहचला असून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ऑक्सिजनचा टँकर पोहचताच लागलीच टॅंक भरण्यास सुरुवात झाली असून २ तासात पूर्ण टॅंक भरला जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद हे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पूर्ण वेळ रुग्णालयात लक्ष ठेऊन होते. नियोजन चोख असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/843554596370331/

 

अशोक वनवास आढाळे याचं निधन

0
ashok adhalae

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । अशोक वनवास आढाळे याचं दि. 13 मे रोजी ७ वाजून ५५ मिनीटांनी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, दोन नातु, एक नात असा परिवार होत.

सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आकाश धनगर

0
akash dhangar

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन महाराष्ट्र राज्याची  संस्थापक तुषारजी जाधव व प्रदेशाध्यक्ष साजिदजी शेख यांच्या उपस्थित दि. १२ मे, २०२१ रोजी झूमवर ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकीत सर्वानुमते जळगाव जिल्हाध्यक्ष पदी आकाश धनगर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

आकाश धनगर यांनी आजपर्यंत समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनसाठीचे कार्य पाहाता त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनच्या वाढीकरिता जोमाने कार्य करेल. तसेच आपण अंगीकारलेल्या समाजसेवेचे व्रत यापुढेही वटवृक्षाप्रमाणे फैलावत नेऊन समाजास त्याचा छायेखाली घेईल असे आकाश धनगर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले. आपल्या हातून देशसेवा , समाजसेवा , घडून समाजातील दुर्बल-दुर्लक्षित घटकांचे आयुष्य उज्वल करावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे अध्यक्ष साजिदजी शेख म्हणाले.

आकाश धनगर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनचे  संस्थापक अध्यक्ष तुषारजी जाधव यांनी आकाश धनगर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साजिदजी शेख, नाशिक जिल्हाध्यक्ष शिवम जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा. रामचंद्र परदेशी, वर्धा जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष खरात व जळगाव जिह्यातील समाजकार्यकर्त्यांनी आकाश धनगर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.