जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्ही येत्या गुरुवारी (दि. 23) भुसावळहून वर्धा किंवा बडनेरा येथे मेमू गाडीने प्रवासाचे नियोजन करत असाल, तर ही बातमी महत्त्वाची आहे. भुसावळ विभागातील पारस – गायगाव – अकोला दरम्यान ‘ऑटोमेटिक ब्लॉक सेक्शन’च्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे भुसावळ-वर्धा आणि भुसावळ-बडनेरा दरम्यान धावणाऱ्या मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे.

या गाड्या रद्द?
येत्या गुरुवारी २३ एप्रिल राजी, गाडी क्रमांक १११२१ भुसावळ-वर्धा मेमू, १११२२ वर्धा- भुसावळ मेमू, ६११०१ भुसावळ-बडनेरा आणि ६११०२ बडनेरा – भुसावळ मेमू या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या उशिराने धावणार?
या ब्लॉकमुळे ओखा–पुरी एक्सप्रेसचे (२०८२०) शेगाव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान सुमारे २ तास २५ मिनिटे नियमन करण्यात येईल. तसेच, गोंदिया–कोल्हापूर एक्स्प्रेसचे (११०४०) काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास २० मिनिटे नियमन करण्यात येईल. हजूर साहिब नांदेड–श्री गंगानगर एक्सप्रेसचे (१२४८५) काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास नियमन करण्यात येईल. या बदलांचा परिणाम राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य प्रवाशांवर होणार आहे.
यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी हा ब्लॉक अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाने केले आहे.







