चाळीसगावजळगाव जिल्हा

चाळीसगावात भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव  विशेष । चाळीसगाव भारतीय जनता पक्षा मधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर तोफ डागत एक पत्र सोशल मीडियात व्हायरल केले आहे. या माध्यमातून खा. पाटील आणि आ. चव्हाण यांत्यातील सुप्त संघर्ष पुन्हा लोकांपुढे आला आहे. नगरसेवक तथा शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना जाहीर पत्र लिहून या उद्रेकाला वाचा फोडली आहे.

त्यांनी पत्रात लिहिले आहे कि ,

भाजपचे खासदार साहेब नमस्कार,
मी घृष्णेश्वर (तात्या) पाटील बोलतोय,

आज आपली आठवण काढण्याची गरज वाटली म्हणून हा लेख प्रपंच…

गेल्या १० वर्षांपासून मी आपल्या समवेत सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असतांना अनेक चांगले व वाईट प्रसंग माझ्या जीवनात येऊन गेले. २०१४ साली आपण चाळीसगाव विधानसभेला कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या बळावर भरघोस मतांनी निवडून आलात. आपण निवडून आल्यावर चाळीसगाव शहराचं चित्र बदलेल असा आशेचा किरण ठेवत चाळीसगाव शहरातील सामान्य नागरिक आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करत होता. आणि कदाचित याचाच भाग म्हणून या शहरातील नागरिकांनी ४५ वर्षाची शहर विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आणत लोकनियुक्त नगराध्यक्षांसह तब्बल १३ नगरसेवक निवडून दिले. यात माझाही समावेश होता.

नगरसेवक पदाचा विषय तर नंतरचा त्याअगोदर पक्षाने मला २०१६ मध्ये शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. आपल्या नेतृत्वात काम करत असतांना संघटना (पक्ष) सर्वोच्च समजत आम्ही आजवर एक-एक कार्यकर्ता जोडत होतो आणि आजही जोडत आहे.

परंतु या दरम्यानच्या काळात सहजासहजी आपण पक्षाच्या अनेक जुन्याजाणत्या लोकांना बाजूला सारत होतात जणू “नया जोडो, पुराना छोडो” हा विचारच आपल्या मनात होता कि काय असा प्रश्न संबंध तालुक्यात आपल्या संदर्भात निर्माण झाला व आजही तीच प्रथा पुढे चालू ठेवत नव्याने जोडलेल्या कार्यकर्त्यांना देखील बाजूला सोडत त्यांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी पर्याय देत आहात.
असे म्हणतात ना काळ बदलतो वेळ बदलतो तसा माणूसही बदलतो याची खरी जाणीव तर आम्हाला २०१९ या वर्षात झाली. लोकसभा निवडणूका लागल्या अन पक्षाने वेळेवर आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवत जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली.

साहेब आईची शप्पथ घेऊन सांगतो, मीच काय भाजपच्या चाळीसगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याने घरच्या भाकरी खात प्रामाणिक पणे आपला प्रचार करत महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या मताधिक्याने निवडून आणले. आपण तालुक्यात एकही दिवस प्रचाराला आले नाहीत तरीदेखील सामान्य कार्यकर्त्याने स्वतःच्या अंगावर घेत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आपला प्रचार केला. साहेब आपण भाजपच्या उमेदवारीवर म्हणजे कमळावर निवडून आला आहात हे आपण विसरले आहात कि काय असा प्रश्न माझासह सर्वच कार्यकर्त्यांना सध्या पडला आहे.
२०१९ ला आपण खासदार झालात तदनंतरच्या काळात रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी आपल्या सर्वात जवळचे मित्र तथा विश्वासू साथीदार म्हणजेच आजचे आमदार श्री. मंगेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. सर्वांना वाटायचे कि आपण आपल्या मित्राला साथ देत आमदार कराल, तिकिटासाठी शिफारस कराल, परंतु समस्त तालुक्याने आपल्यातला स्वार्थी माणूस पाहिला. तिकिटासाठी मित्राची शिफारस तर दूरच आपण जवळचा कुणीच मोठा नको झाला पाहिजे, नव्हे तर मीच सर्वश्रेष्ठ असा अहंकार बाळगत मित्रत्वाला तडा देत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक कटकारस्थान रचले याविषयाची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात होती. आपला विरोध असतांनाही पक्षाने आमदार श्री. मंगेश चव्हाण यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे कदाचित उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले.

“२५००० मतांनी श्री मंगेश चव्हाण निवडून येतील असे छाती ठोकून सांगणारा माझा एक मित्र, मंगेश चव्हाण हे जवळपास ४५०० मतांनी निवडून आल्यावर खासदारांनी विरोधात काम केले असा तुमच्या पक्षाचा गद्दार खासदार काय कामाचा हे सांगत होता तेव्हा माझी मान शरमेने खाली गेली.”
साहेब हे सर्व कधीच खर वाटायचं नाही, अनेक लोक तुमच्यासंदर्भात वाईट बर सांगायचे. तरीदेखील या पलीकडे जात आम्ही आमच्या नेत्याचा सन्मान कमी न व्हावा म्हणून आजवर अपमानाची व बदनामीची झालर स्वतःच्या अंगावर घेतली. गोष्ट इथवर थांबली नाही, तर वेळेच्या प्रवाहात कधी तालुक्यात भाजपमध्ये गटबाजी आणि दुफळी निर्माण झाली हे आमचं आम्हालाही कळालं नाही.
आज माझ्यासह पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी खासदार गटाचा कि आमदार गटाचा असा प्रश्न अनेक लोक प्रत्यक्ष विचारतात आणि अशावेळेस आम्हास “आम्ही कमळाचे म्हणजेच भाजपचे” असे उत्तर द्यावे लागते.

साहेब आपली निवडणूक तर झाली, आमदारांचीही निवडणूक झाली आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आगामी काळात आहेत. आणि अशा परिस्थितीत आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती याउलट मात्र नुकतेच आपण शहरात घेतलेले कोरोना लसीकरण शिबिरात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. पक्षातील जी गटबाजी लपून होती किंवा फक्त चर्चेत होती ती आपण उघडच केली. अनेक ठिकाणी शहरात प्रभागनिहाय आपण शिबिरे घेतलीत व ज्यांच्या माध्यमातून घेतलीत त्यांनी तुमच्या फोटोसह मोदी साहेबांच्या फोटोचे बॅनर लावलेत, परंतु हे करत असतांना आपण बॅनरवर ना कमळ घेतले ना पक्षाचा प्रोटोकॉल. एवढंच काय लसीकरण शिबिराच्या आयोजनाच्या काही ठिकाणच्या बॅनरवर आपल्या म्हणजेच भाजपच्या खासदारांसह विरोधी पक्षाच्या काही लोकांचे एकत्रित फोटो होते यावरून नेमके समजायचे तरी काय ?

या गोष्टीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, नव्हे तर खासदार साहेबांनी त्यांच्या मनातील नगरपालिकेचे उमेदवारच जाहीर केले अशी चर्चा जनमानसात आहे.

साहेब मलाच काय आपण हे करत असतांना शहरातील पक्षाच्या एकही पदाधिकारी तसेच नगरसेवकास विचारात घेतले नाही हि मात्र वस्तुस्थिती. खरंतर लसीकरण शिबीर घेण्याची सुरुवात जिल्ह्यात मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जामनेर येथून झाली. साहेब आपण संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे खासदार आहात मग लसीकरण शिबीर फक्त चाळीसगाव तालुक्यात घेण्यामागचा आपला उद्देश तरी काय ?

अहो आपण २०१४ ला विधानसभेला निवडून आल्यापासून बदनामीची चादर माझा अंगावर घेतली, एवढंच काय आपण २०१९ ला लोकसभेला निवडणूक लढवत असतांना निकालाच्या १ दिवस अगोदरच आत्मविश्वासाने आपल्या विजयाचे मोठे बॅनर लावून शुभेच्छा देणारा मी कार्यकर्ता होतो. आणि आज मलाच कार्यकर्त्यांना काय उत्तरे द्यावीत याचा प्रश्न पडलाय. आपण करत असलेल्या अशा हालचालींमुळे भारतीय जनता पक्षाचे खच्चीकरण करत आहात हे मात्र नक्की. मी आपणास सल्ला देण्या इतका मोठा तर नाही परंतु येणाऱ्या काळात पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपणास चाललेल्या या सर्व प्रकारावर जाब विचारल्या शिवाय राहणार नाही हे मात्र लक्षात असू द्या.
तूर्तास इतकेच….

घृष्णेश्वर (तात्या) पाटील
(शहराध्यक्ष – भाजपा शहर मंडल चाळीसगाव)

 

 

 

 

https://www.facebook.com/ghrushnewar.patil?fref=nf

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button