⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

भाजपचं ठरलं : सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु, आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्यात सध्या मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. मुख्यमंत्री सरकार बरखास्तीची शिफारस करणार असल्याचे समोर येत असून दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis in Delhi) हे दिल्ली दरबारी सत्ता स्थापनेची जुळवाजुळव करण्यासाठी लागले आहेत. भाजपने सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु केली असून राज्यभरातील आमदारांना सूचना देखील केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सूचना केल्याचे समजते. (BJP will form the government)

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार फुटणार असल्याचे समोर आले आहे. शिंदे यांच्यासह ४० आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांनी अद्याप आपला स्पष्ट निर्णय जाहीर केला नाही. राज्यात महाविकास आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरु झाले असून शिवसेनेने आपली सत्ता पायउतार होणार असल्याचे जवळपास मान्य केले आहे. शिवसेना खा.संजय राऊत यांनी देखील तसे ट्विट केले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे चित्र दिसत असल्याने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कामाला लागले आहेत.
हेही वाचा : Eknath Shinde Updates : जळगावातील शिवसेनेचा शेवटचा आमदार देखील फुटला!

देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करीत असून सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव करीत आहेत. राज्यात भाजपने आपल्या पक्षाच्या आमदारांना लागलीच काही सूचना केल्या आहेत. पक्षाने मुंबईत असलेल्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे सांगितले असून उर्वरीत आमदारांना आपापल्या मतदार संघात थांबण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपाल यांनी अधिवेशन बोलवणे सारख्या काही निर्णय घेतले तर खबरदारी म्हणून भाजपा आमदार बोलवण्यात आले आहे. तिकडे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदार महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. याचाच अर्थ शिंदे आजच महाविकास आघाडीवर प्रहार करून सरकारमधून बाहेर पडू शकतात.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये समन्वयाची जबाबदारी भाजपचे संजय कुटे, मोहित कंभोज, रविद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या दिवसापासून शिवसेना आमदारांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी जळगावकर खा.सी.आर.पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या दिसत असलेले संख्याबळ लक्षात घेत ते वेगळा गट स्थापन करू शकतात. शिंदे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत भाजपने आमदारांना सूचना केल्या आहेत.