जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२३ । भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज बुधवारी पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. गेले एक दीड वर्षे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. Girish Bapat passed away
आज बुधवारी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
बापट यांच्यावर सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU Ward) उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्यामुले त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून भाजच्या गोटात हालचालींना वेग आला होता. गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेश रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते पुण्याकडे रवाना झाले आहेत.
कोण आहेत गिरीश बापट?
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.
स्वयंसेवक ते भाजप नेते
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.