जागतिक पाणथळ प्रदेश दिनी वाघुर धरण परिसरात पक्षी गणना, ६८ जातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद
जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे महत्व लक्षात घेऊन वाघुर धरण परिसरात सकाळी ८ ते १० या वेळेत पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत ६८ जातींचे मिळून एकूण ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून विशेष म्हणजे रेशाळ बगळा आणि तपकिरी खाटीक या हिवाळी पाहुण्यांची पक्ष्यांची नोंद झाली.
ही गणना पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ, बाळू महांगडे यांनी केल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. ते पुढे म्हणाले की पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे, पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ प्रदेशच्या/जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. पाणथळ जागी पक्ष्यांच्या किती जाती आहेत व किती संख्येनी आहे. त्यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरत असते. त्या दृष्टीने पाणथळ पक्षी गणनेचे महत्व आहे. हे ओळखून आम्ही ही गणना केली.
या पक्षांची नोंद
गणनेत पाणथळ पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने वारकरी- २१८, छोटा पाणकावळा-९०, इतक्या मोठ्या संख्येने नोंदवण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की यांचे सोबत अल्प संख्येने गडवाल, तरंग, थापट्या, भुवई बदक, लालसरी, साधा पाणलाव, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी, काळ्या शेपटीचा मालगुजा, कंठेरी चिखला, पाणकाडी बगळा, मोऱशराटी, काळा शराटी, शेकाट्या, चिखल्या, हिवाळी सुरय, पांढुरका हरिण, उघड चोच करकोचा, आशियाई कवडी मैना, करडा धोबी, हिरवा बगळा, पांढर्या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, युरेशियन दलदल इत्यादी पाणपक्षी नोंदण्यात आले.
या गणनेत अपेक्षित असणारे चक्रवाक, नयनसरी, शेंडीबदक, चमच्या, तिरंदाज, हिरवा तुतार, छोटा आर्ली, कैकर, मोठा पाणकावळा, भारतीय पाणकावळा, रंगीत करकोचा, कांडेसर हे पक्षी दिसले नाही.
पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ, मो.क्र.९४२३९७३११५
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..