⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

नशिराबाद टोल नाक्यावर मोठा घोटाळा उघड, नकली पावत्यांचे दोन मशीन जप्त!

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । जळगाव-भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळ असलेल्या टोल नाक्यावर मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली आहे. टोल नाक्यावर बनावट पावत्यांचे दोन मशीन आढळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

जिल्ह्यातील अनेक महामार्गांचे काम सुरू असून काही काम रखडले आहे. चिखली ते तरसोद महामार्गाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरू झाली आहे. महामार्गावर नशिराबादजवळ टोलनाका उभारण्यात आला असून टोल आकारणी देखील सुरू झाली आहे. नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅग नसलेल्या वाहनांना मॅन्युअल पद्धतीने पावती देण्यात येत असते. फास्ट टॅग नसल्यास जास्तीची टोल आकारणी केली जाते.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी टोल नाक्यावर नकली पावत्या देऊन टोल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. गुरुवारी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी लागलीच रात्री १० वाजता माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्यासोबत सहाय्यक निरीक्षक राहुल फुला, उपनिरीक्षक सुनिल चौधरी, हवालदार प्रविण पाटील, सचिन विसपुते, अजमल बागवान, भारत डोखे, चालक शिपाई आसिफ तडवी आदींचे पथक टोलनाक्यावर पोहचले.

टोल नाक्यावर पथकाने केलेल्या तपासणीमध्ये नकली पावती काढणारे दोन मशीन जमा केले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. गुप्ता यांनी याप्रकरणी ‘नही’चे अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांच्याशी चर्चा केली आहे.