जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १३ जून २०२२ पासून सुरू होणार आहेत.आपला पाल्य शिकला पाहिजे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते ,१३जून पासून सुरू होणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये पालकांनी अधिकाधिक संख्येने आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ.पंकज आशिया यांनी १जून जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने एका पत्रकाद्वारे तमाम पालकांना केले आहे.

शाळापूर्व तयारी पहिला शाळास्तर मेळावा १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता . त्यामध्ये १८२१ शाळेतील २९हजार ३४७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले होते . शाळापुर्व तयारी दुसरा मेळावा १५ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे . आपलं मूल हे शिकल पाहिजे असे प्रत्येक पालकांना वाटते जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना १३ जून २०२२ ला अधिक संख्येने शाळेत दाखल करावे . पालक म्हणून आपली जबाबदारी महत्वपूर्ण आहे . शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये दि . १३ जून २०२२ पासून शाळा सुरु होणार आहेत. आपलं मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता आपण आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे ,जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली जात आहे . सन २०२१-२२ मध्ये शाळाबाहेरची शाळा , शाळा बंद पण शिक्षण सुरु , व्ही स्कुल अॅप , गल्ली मित्र , एक गाव एक बालरक्षक , मिशन शिक्षण हमी पत्रक , पालक संपर्क अभियान असे विविध उपक्रम शिक्षण विभागाने राबवून विद्यार्थ्याचे शाळेशी नाते टिकवून ठेवलेले आहे व यापुढे हे नाते अधिक घट्ट करावयाचे आहे . शैक्षणिक सत्र २०२२ – .२३ मध्ये सुध्दा अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्याच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू दिला जाणार नाही . मुलांच्या व्यक्तीमत्वाच्या चांगल्या विकासासाठी सर्वागीण शिक्षणासाठी , बौध्दिक विकास तसेच चांगले नैतिक मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने आजच संकल्प करुया की मी माझे मूल हे शाळाबाहय राहू देणार नाही , त्याला नियमित शाळेत पाठविणे हे माझे कर्तव्य आहे ते मी पार पाडीन . माझा पाल्य हेच माझे भविष्य आहे याची मला जाणीव आहे . चला तर मग आपल्या पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबध्द होऊया …. असे आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.










