⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती बिघडली, लवकरच दिल्लीला नेणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात असताना अचानक भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. सिलिगुडी येथे एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे भाषण सुरु असताना हा प्रकार घडला. त्यामुळे नितीन गडकरी (Nitin Gadkari) व्यासपीठावरील खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर गडकरी यांना तातडीने व्यासपीठावरून खाली नेण्यात आले. नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांना याठिकाणी पाचारण करुन नितीन गडकरी यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

नितीन गडकरी यांना मधुमेह असून शरीरातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अचानक घडलेल्या प्रकारानंतर नितीन गडकरी यांना भाजपचे स्थानिक खासदार राजू बिस्टा यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. गडकरी यांना आता बरे वाटत असले तरी त्यांना लवकरच दिल्ली येथे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वीही काहीवेळा नितीन गडकरी यांची तब्येत बिघडल्याचे प्रकार घडले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये अहमदनगर येथील कार्यक्रमात नितीन गडकरी कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध पडले होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. राज्यपालांनीच त्यांना मंचावर आधार दिला. यानंतर नितीन गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तर २०१० साली जंतरमंतरवरील कार्यक्रमातही गडकरी यांना चक्कर आली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मधूमेह आणि वजन कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. सप्टेंबर २०११ साली त्यांच्यावर बॅरिएट्रिक सर्जरी करण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये १२०६ कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्गांच्याप्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती आता ठीक आहे.