⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | मोठी बातमी : शिवसेना देणार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा!

मोठी बातमी : शिवसेना देणार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । राज्यात झालेल्या मोठ्या सत्तांतर नाट्यनंतर सर्वकाही सुरळीत होत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली असून नवीन सरकारचे मंत्रिमंडळ लवकरच अस्तित्वात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची करावी तात्काळ करण्यास विधानसभा अध्यक्षांना नकार दिला आहे. शिवसेना आणि भाजप सध्या दोन्ही कट्टर विरोधी झाले असून त्यातच राष्ट्रपती पदाची निवडणूक येऊन ठेपली आहे. भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली होती. शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत खा.संजय राऊत यांनी दिले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक येऊ घातली असून एकीकडे भाजपाने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केलेली असताना दुसरीकडे युपीएचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा उभे राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणते पक्ष कुणाला पाठिंबा देणार? यावरून सध्या चर्चा सुरू आहे. नुकतेच राज्यात शिवसेनेत फूट पडली असून बंडखोरांनी भाजपसोबत युती केली आहे. त्यातच शिवसेनेच्या खासदारांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी देखील द्रौपदी मुर्मूंनाच पाठिंबा देण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. 

खा.संजय राऊत म्हणाले, यशवंत सिन्हा यूपीएचे उमेदवार आहेत. त्यांनाही सदभावना आहेत. विरोधकांचं ऐक्य टिकलं पाहिजे हे खरं असलं तरी अशा निवडणुकीत लोकभावना पाहिल्या पाहिजे. यापूर्वी आम्ही प्रतिभाताईना पाठिंबा दिला. एनडीएला दिला नव्हता. प्रणव मुखर्जींनाही दिला. एनडीएत असताना पाठिंबा दिला. शिवसेनेला अशा प्रकारचा निर्णय घेण्याची परंपरा आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील. आज उद्या ते निर्णय जाहीर करणार आहेत. पक्षप्रमुख हे दबावाखाली निर्णय घेत नाहीत. त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक आहे, असं राऊत म्हणाले.

सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि सर्व खासदारांशी चर्चा केली. यावेळी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका खासदारांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली असून त्यानुसार निर्णय घेण्याची विनंती केली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. काल बहुसंख्य खासदार बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते. त्याला आम्ही काय करणार? भावना गवळी नव्हत्या. बाकी बहुसंख्य खासदार होते, असंही त्यांनी सांगितलं. कालची बैठक दुपारी 12 ते 4 पर्यंत चालली. बैठक संपल्यावर मी लगेच गेलो. सामनात काम होते असे त्यांनी स्पष्ट केले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.