मोठी बातमी : परस्पर गाळे हस्तांतरीत करणाऱ्या गाळेधारकांवर मनपा उगारणार दंडाचे हत्यार
जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | ज्या गाळेधारकांनी मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटसह इतर मार्केटमधील गाळ्यांची परवानगी न घेताच, परस्पर विक्री केली आहे. अश्यांवर मनपा दंडाचे हत्यार उगारणार आहे. अश्या गाळेधारकांवर महापालिकेकडून २५ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून ३० रोजी होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच १ जूननंतर जे गाळेधारक परस्पर हस्तांतर करतील, अशा गाळेधारकांना २५ हजार रुपयांच्या दंडासह गाळे देखील नियमित करून घेतले जाणार नाही अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे.
महापालिकेने लिलाव प्रक्रियेसह इतर नगरपालिकेच्या काळात ज्या गाळेधारकांना गाळे भाडेपट्ट्यावर वापरण्यासाठी दिले होते. अशा गाळेधारकांपैकी अनेक गाळेधारकांनी महापालिकेची परवानगी न घेता, दुसऱ्या व्यक्तीला गाळे विक्री केल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये महापालिकेला हस्तांतरीत प्रक्रियेची रक्कम देखील मिळालेली नाही. तसेच मनपा प्रशासनाचीही दिशाभूल करण्यासह महापालिकेच्या नियमांचा भंग देखील करण्यात आला आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता कठोर निर्णय घेतला आहे. दरम्यान, महापालिकेचे हस्तांतरणबाबत धोरण ठरण्याआधी ज्या गाळेधारकांनी परस्पर हस्तांतरण केले आहे. अशा गाळेधारकांना २५ हजार रुपयांच्या दंडासह गाळे नियमित करून दिले जाणार आहे. मात्र, १ जूननंतर जे गाळेधारक परस्पर हस्तांतरण करतील, अशा गाळेधारकांना २५ हजार रुपयांच्या दंडासह संबधित दुकान महापालिका ताब्यात घेणार असून, ते हस्तांतरण नियमित केले जाणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.