⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी : चिखली-तरसोद महामार्गाचे बांधकाम करणार्‍या कंपनीला ७५ लाखांचा दंड

Bhusaval News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । जळगाव-भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळ असलेल्या टोल नाक्यावर गुरुवारी रोजी मोठा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली असताना याच म्हणजे चिखली ते तरसोद या महामार्गातील टोल नाका असणार्‍या टप्प्याचे बांधकाम करणार्‍या आयुष प्रोकॉन कंपनीला तहसीलदारांनी तब्बल ७५ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गौणखनिजाचा बेसुमार उपसा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

जिल्ह्यातील अनेक महामार्गांचे काम सुरू असून काही काम रखडले आहे. चिखली ते तरसोद महामार्गाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरू झाली आहे. महामार्गावर नशिराबादजवळ टोलनाका उभारण्यात आला असून टोल आकारणी देखील सुरू झाली आहे. नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅग नसलेल्या वाहनांना मॅन्युअल पद्धतीने पावती देण्यात येत असते. फास्ट टॅग नसल्यास जास्तीची टोल आकारणी केली जाते.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी टोल नाक्यावर नकली पावत्या देऊन टोल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी वरून गुरुवारी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी लागलीच रात्री १० वाजता माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्यासोबत सहाय्यक निरीक्षक राहुल फुला, उपनिरीक्षक सुनिल चौधरी, हवालदार प्रविण पाटील, सचिन विसपुते, अजमल बागवान, भारत डोखे, चालक शिपाई आसिफ तडवी आदींचे पथक टोलनाक्यावर पोहचले. टोल नाक्यावर पथकाने केलेल्या तपासणीमध्ये नकली पावती काढणारे दोन मशीन जमा करण्यात आले.

दरम्यान, चिखली ते तरसोद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामातील सुमारे ५० किलोमीटरच्या कामाचे उपकंत्राट हे आयुष प्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालेले आहे. वाघूर नदीच्या काठावर असणार्‍या तिघ्रे गावाच्या परिसरात सदर कंपनीने आपले युनिट उभारले आहे. या हायवेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौणखनिज लागते. यासाठी कंपनीने भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण येथील एका शेतातून दगड,माती, मुरूम आदी काढण्यासाठीचा करार केला होता. मात्र विहीत करारापेक्षा यातून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.

भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांनी या तक्रारीवरून चौकशी करून यात आयुष प्रोकॉन कंपनीचा चूक असल्याचा ठपका ठेवत कंपनीला तब्बल ७५ लाख, ५६ हजार २८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड तीन दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.