⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

मोठी बातमी : जिल्ह्यात यंदा ७ लाख ५६ हजार ६०० हेक्टर वर होणार पेरणी !

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.


या सभेत सन २०२२-२३ खरीप हंगाम व रब्बी हंगामातील बियाणे, रासायनिक खते मागणी व पुरवठयाबाबत सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगाम २०२२ मध्ये जिल्ह्यात एकुण ७ लाख ४१ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.२२ टक्के) पेरणी करण्यात आली होती. या पेरणीकरीता एकुण मागणी प्रमाणे ३९ हजार ६७३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते.


खरीप हंगाम २०२३ करीता ७लाख ५६ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी सार्वजनिक व खाजगी कंपन्यांमार्फत ३८ हजार ८८१ क्विंटल बियाणे पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामबिजोत्पादन अंतर्गत १७ हजार क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकरीस्तरावर उपलब्ध आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये मागणीप्रमाणे २ लाख ६८ हजार ५५० मे.टन खत पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला होता.


खरीप हंगाम २०२३ साठी ३ लाख ५ हजार १४० मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजुर करण्यात आले असुन जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ९२ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.


या बैठकीत श्री. वाघ यांनी कृषि विभागाचे अधिकारी, खत कंपनीचे प्रतिनिधी व वितरक यांचा आढावा घेताना कृषि निविष्ठा विक्री केंद्रांवर दर्शनी भागात परवाना, भावफलक लावण्यात यावे. कापूस व इतर बियाण्याची, खतांची किंमत व शिल्लक साठा याची माहिती लिहण्याचे सुचित केले, कापुस बियाण्यांच्या जास्त मागणी असलेल्या वाणाचे उपलब्धतेबाबत नियोजन करण्याच्या सुचना उत्पादक कंपनी व अधिकारी यांना देण्यात आल्या व गुलाबी बोंडअळीचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस लागवड 1 जुन नंतर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. कोणत्याही परीस्थीतीत शेतकऱ्यांपर्यंत बोगस खते, बियाणे व किटकनाशके पोहचणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक वेळा परराज्यातील काही कंपन्या शेतकऱ्यांच्या बाधांपर्यंत बोगस बियाणे, खते व किटकनाशके विक्री करण्याचा प्रयत्न करतात अशा बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते याकडे लक्ष देऊन खबरदारी घ्यावी. व असे प्रकार आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे सुचित केले.

शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच पक्कया बिलाने खरेदी करावीत. येत्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्वक निविष्ठा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील वितरक व अधिकारी यांनी सज्ज रहावे. एच.टि.बि.टी. कापुस बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून एच.टि.बि.टी. कापुस बियाणे विक्री रोखण्यासाठी मदत करावी. युरीया तसेच इतर रासायनिक खतांची बचत करणे या शासनाच्या मोहिमे अंतर्गत सर्व रासायनिक खत कंपनी प्रतिनीधी, शासकीय अधिकारी व कृषि निविष्ठा विक्रेते यांनी शेतकऱ्यांनी घरच्या घरी तयार केलेले सेंद्रीय खत, जैविक खत शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत याचा वापर वाढविणेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी व जमिन आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. तसेच खरीप हंगामात खत साठा मुबलक प्रमाणात असून जास्तीत जास्त नॅनो युरीया व डि.ए.पी. वापरावर भर देण्यासाठी कंपन्यानी कृषि विभागासोबत समन्वय करून शेती शाळेचे नियोजन करणे बाबत सुचना दिल्या.

रासायनिक खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादनांची लिकींग होणार नाही याबाबत खत कंपन्याना सक्त सूचना दिल्या. तसेच शेतकरी बांधवाना खत वेळेत पुरवठा होईल याची काळजी घेणे बाबत कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी व खत कंपनी प्रतिनिधी यांना सुचीत केले.


त्यानंतर कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची सभा घेण्यात आली त्यात खरीप हंगाम पूर्व करावयाच्या कामाचे नियोजन व उपाययोजना याबाबत अवगत करण्यात आले. त्याचबरोबर महिना निहाय कारावयाचे कामाचे नियोजनाचे वेळापत्रक सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना उपलब्ध करून देवून कार्यवाही कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी करावी असे स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यातील कृषि विभागाच्या रिक्त पदांबाबत चर्चा करतांना स्पष्ट केले की, क्षेत्रियस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात येणार असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. वाघ यांनी सांगितलिे.


या बैठकीस संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिप., दादाराव जाधवर, उपविभागीय कृषि अधिकारी, अमळनेर, नंदकिशोर नाईनवाड, उपविभागीय कृषि अधिकारी, पाचोरा, विजय पवार, मोहिम अधिकारी जिप. अरूण तायडे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, सर्व तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, श्री. शैलेद्र काबरा, उपाध्यक्ष जिल्हा डिलर्स असो. जळगाव तसेच प्रमुख खत कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते असोशिएशनचे पदाधिकारी व प्रमुख खत वितरक उपस्थित होते.