जळगाव लाईव्ह न्यूज । मागील दोन वर्षांपासून सातत्याने वाढणाऱ्या खोबरेल तेलाच्या किमती आता अखेर कमी होऊ लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रतिलिटर सुमारे ९०० रुपयांपर्यंत पोहोचलेले खोबरेल तेल आता स्वस्त झाले असून गेल्या अवघ्या १५ दिवसांत दरात तब्बल १३० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

दर घसरण्याचे मुख्य कारण काय?
देशातील प्रमुख नारळ उत्पादक राज्ये असलेल्या केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये यंदा नारळाचे बंपर उत्पादन झाले आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये नारळापासून मोठ्या प्रमाणावर खोबरेल तेलाची निर्मिती केली जाते. देशांतर्गत उत्पादन वाढल्याने बाजारात तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणाऱ्या नारळ उत्पादनांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शिपिंग खर्चात (वाहतूक खर्च) वाढ झाल्याने निर्यात कमालीची मंदावली आहे. परिणामी, स्थानिक भारतीय बाजारपेठेत साठा वाढल्याने दरामध्ये घसरण झाली आहे.
घाऊक बाजारातील मंदीचा परिणाम आता किरकोळ बाजारातही दिसू लागला आहे. नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. पूर्वी प्रतिलिटर ८०० ते ९०० रुपयांना विकले जाणारे ब्रँडेड खोबरेल तेल आता ७५० रुपयांपर्यंत खाली आले आहे.
नारळ स्वस्त, तर खोबरे स्थिर
खोबरेल तेलाचे दर घसरले असले, तरी सध्या सुक्या खोबऱ्याचे भाव ४०० ते ४५० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत. मात्र, ओल्या नारळाच्या दरात मोठी घसरण झाली असून, सध्या बाजारात १०० रुपयांत चार नारळ सहज उपलब्ध होत आहेत. एकूणच नैसर्गिक अनुकूलता आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे ऐन कडक उन्हाळ्यात खोबरेल तेलाच्या दराने ग्राहकांना काहीसा सुखद गारवा दिला आहे.







