Big Breaking : जळगावात सिरीयल किलरला पकडले, वृद्ध महिलांना एकटे हेरून घेत होता जीव
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । पैशांसाठी कोण केव्हा कुणाचा जीव घेईल याचा काही नेम नाही. यावल तालुक्यातील किनगाव येथील असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव एलसीबीच्या पथकाने उघड केला आहे. गावातच राहून मिळेल ते काम करीत गावातील एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलांना हेरायचे आणि एकटे पाहून रुमालाने गळा आवळत त्यांचा खून करायचा असे प्रकार तो करीत होता. मे महिन्यात झालेल्या एका खुनाचा तपास करताना आरोपीने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून दागिने आणि पैशांसाठी खून केल्याचे त्याने सांगितले आहे. घटनास्थळी मिळालेल्या एका चप्पलच्या आधारे शोध घेत एलसीबीने गुन्ह्याचा छडा लावला आहे.
यावल पोलीस स्टेशन हद्दीत रामराव नगर, किनगाव ता.यावल येथे मराबाई सखाराम कोळी वय-७० ही वृध्द महिला घरी एकटीच राहत असल्याचे पाहून कोणीतरी अज्ञात आरोपीने दि.२३ मे रोजी दुपारी ११ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने चोरी करण्यासाठी जावून वृध्द महिलेस एका काळया रुमालाने गळ आवळून तिचे अंगावरील चांदीचे दागिने चोरुन पळून गेला होता. वृध्द महिलेच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला कळविले. महिला ही बेशुध्द झाल्याने त्यांना जळगाव येथे दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. याबाबत यावल पो.स्टे.ला गु.र.नं. २३५/२०२२ भादंवि क.३९२, ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. जखमी वृध्द महिला दि.२ जून रोजी दवाखान्यात उपचार घेत असतांना मयत झाल्याने सदर गुन्हयात भादंवि कलाम ३०२,३९७ हे वाढीव कलम लावण्यात आले होते.
गुन्हयांतील अज्ञात आरोपीच्या शोध बाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नसल्याने वरिष्ठांनी एलसीबीच्या पथकाला पुढील तपासाकामी सूचना दिल्या होत्या. घटनास्थळी मिळून आलेल्या एका चप्पलवरुन पथक कामाला लागले. चप्पल कोणत्या डिलरकडून कुठे वितरीत झाली याची माहिती काढून व तांत्रिक पुराव्यावरुन गुन्हयांत संशयीत म्हणून मुकुंदा ऊर्फ बाळु बाबुलाल लोहार वय-३० रा.चौधरीवाडा किनगाव ता. यावल यास दि.२७ जून रोजी ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवीत त्यास गुन्हयांबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. वृध्द महिला अंदाजे ६ ते ७ महिन्यापूर्वी रेशनचा सामान घेण्यासाठी आरोपीच्या घराकडे गेली होती. त्यावेळी रेशन जास्त असल्याने मयत वृध्द महिलेकडून सामान उचलले जात नसल्याने आरोपीने तिस रेशन सामान पोहचवून दिले होते. व त्यावेळी वृध्द महिला ही एकटीच राहत असल्याची खात्री केली होती.
पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीने वृध्द महिला द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे वय-७० रा.चांभारवाडा किनगाव ता. यावल या देखील घरी एकटीच राहत असल्याचे पाहून यापुर्वी दि.२८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान लाईट गेल्याचा फायदा घेवून महिलेच्या घरात घुसून रुमालाने गळा आवळून तिचा जीव घेतला होता. तसेच आरोपीने वृद्धेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील पेटीचे कुलूप तोडून त्यातील वृध्द महिलेच्या पेन्शनचे पैसे चोरुन नेल्याचे सांगितले. घटनेबाबत मयताचे नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारे पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नसल्याने त्याची फारशी वाच्यता झाली नाही.
पोलीस खाक्या दाखविताच आरोपीताने चौधरीवाडा किनगाव ता. यावल येथे राहणारी वृध्द महिला रुखमाबाई कडू पाटील वय-७० या महिलेच्या घराशेजारी वेल्डींग वर्क शॉपवर वेल्डींगचे काम करीत असतांना त्याने पाहणी केली होती. वृध्द महिला एकटीच राहत असल्याचे साधुन दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या दरम्यान घरात घुसून महिलेचा रुमालाने गळा आवळून तिला जिवेठार मारुन तिचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत यावल पो.स्टे.ला अ.मृ.र.नं. ७९/२०२९ क्रि.प्रो.को.क. १७४ प्रमाणे दाखल आहे. गुन्ह्यात महिलेचा मृत्यू संशयास्पद असताना देखील पोलिसांनी कर्तव्यात कसूर करीत योग्य तपास केला नव्हता.
गुन्ह्याचा तपास एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदारी वसंत लिंगायत, युनूस शेख, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, संदिप सावळे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, राहुल पाटील, ईश्वर पाटील यांनी करून गुन्हयांतील अज्ञात आरोपीचे शोध कामी अहोरात्र प्रयत्न करुन गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळविले आहे.