जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । भुसावळ पुणे दोन शहरामध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण या मार्गावर रेल्वेची संख्या मर्यादीत असल्यामुळे मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून रीवा-पुणे या साप्ताहिक एक्स्प्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भुसावळकरांना नागपूर आणि पुण्याला जाण्यासाठी आणखी एक नवीन गाडी सुरु होणार आहे.

रीवा ते पुणे दरम्यानच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर ही गाडी कनेक्टर म्हणून काम करणार आहे आणि पुणे ते नागपूर या मार्गावर असणाऱ्या गर्दीवर सुद्धा ही गाडी नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. सोबतच जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सुद्धा ही गाडी फायद्याची ठरेल. या ट्रेनचा मार्ग काय असेल? तिकिट किती असेल? ही ट्रेन नेमकी कुठे कुठे थांबणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..
गाडी क्रमांक 20152/20151 रीवा-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी सकाळी 6:45 वाजता रीवाहून निघेल, गुरुवारी सकाळी 9:45 वाजता पुण्याला येईल. तर पुणे-रीवा एक्स्प्रेस दर गुरुवारी दुपारी 3:15 वाजता पुण्याहून सुटेल, दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता रीवाला पोहोचेल.
पुणे-नागपूर या मार्गावर कुठे कुठे थांबणार ट्रेन –
नागपूर-पुणे यादरम्यान रल्वे प्रवासात आता आणखी एक ट्रेन उपलब्ध झाली. १४ तासांमध्ये नागपूर-पुणे प्रवास होणार आहे. नव्या ट्रेनला वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड येथे थांबे असतील. गाडीत चार सामान्य, सहा स्लीपर, तीन एसी थर्ड टियर, तीन थर्ड एसी इकॉनॉमी आणि दोन सेकंड एसी डबे असतील.