शनिवार, डिसेंबर 9, 2023

तापी दुथडी भरलेली असूनही भुसावळकरांना पाणी विकत घेण्याची वेळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । भुसावळ शहराला तापी नदी लागून आहे. सध्या तापी दुथडी भरलेली असूनही भुसावळकरांना पाणी विकत घेण्याची वेळ आलीय. तापी नदीच्या पुरात गाळाचे प्रमाण वाढल्याने पालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. ताळमेळ बिघडल्याने आता पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच राहिलेले नाही.

शहरात कमी दाबाने, अवेळी व गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. काल बुधवारी शहरातील सर्व भागांना नळावाटे पाणी कमी आणि चिखलाचा पुरवठा जास्त झाला. या गाळमिश्रित पाण्यामुळे घरात बसवलेली आरओ सिस्टिम कुचकामी ठरत आहे.

या समस्येने शहरातून वाहणारी तापी नदी दुथडी असताना सुद्धा पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. पालिकेची पाणीपट्टी व दररोज शुद्ध पाण्याचा जार विकत घेणे असा दुहेरी खर्च करावा लागतो. दरम्यान, शहराच्या उत्तर भागात एक, तर दक्षिण भागात दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. पण, हे ताळमेळ बिघडल्याने आता पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच राहिलेले नाही. गाळामुळे उचल कमी झाल्याने रोटेशनवर परिणाम झाला आहे. पालिकेने रोटेशन सुरळीत करावे, अशी मागणी आहे.