भुसावळ स्टेट बँकेच्या फसवणूक प्रकरणी सहा आरोपींना पोलीस कोठडी
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरातील स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहा कर्जदारांना रविवारी पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अटक केली. राजेश निवृत्ती मेहरे, शकील इमाम गवळी, आसीफ हुसेन गवळी, गजानन रमेश शिंपी, निलेश जय सपकाळे, पंकज भोजनराव देशमुख असे कर्जदाराचे नाव असून, त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता 28 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर असे कि, भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहा कर्जदारांना रविवारी पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अटक केली होती. आरोपींना सोमवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बोगस कर्ज वाटपाबाबत वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्यानंतर वरीष्ठ स्तरावरून चौकशीअंती कर्जदार, व्हॅल्यूअरसह 17 जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.