जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून अनेकांची ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली फसविले जात आहे. अशातच आता यावल तालुक्यातील राजोरे येथील चेतन विनायक नेहेते (वय ३६) या तरुणाची तब्बल २६ लाख रुपयात फसवणूक झाली आहे. याबाबत दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
चेतन नेहेते या तरुणाला टेलिग्राम या सोशल नेटवर्कवर दीपक राज व लेझर्ड एव्हिलीन नामक आयडी असलेल्या दोघांनी संपर्क साधला. विश्वास संपादन करून ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ, असे तरुणाला सांगितले. त्यानुसार १० मे ते ६ जून २०२४ या दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम घेतली.
दरम्यान आपले पैसे परत मिळत नसून फसवणूक झाली, हे निदर्शनास आल्यानंतर चेतन नेहेते याने जळगाव सायबर पोलिस ठाणे गाठले. यानंतर सोशल नेटवर्कवरील दीपक राज व लेझर्ड एव्हिलिन आयडी ओळख असलेल्या दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.