जळगाव लाईव्ह न्यूज । नागरी क्षेत्रामध्ये निर्माण होणारा घनकचरा व सार्वजनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असूनही कित्येक वर्षांपासून ही समस्या भुसावळ शहरातील श्रीनगर परिसरात कायम आहे. भुसावळ शहरातील श्रीनगर भागात असलेल्या खुल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. हा भाग आरोग्यासाठी घातक ठरण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. लाखो रुपये खर्च करून नागरिकांनी या भागात घरे घेतली, बांधली मात्र ज्या प्रकारे दुर्गंधी येते ते पाहता जेवण सुद्धा जात नाही. अनेक जण श्वसनाच्या गंभीर आजाराने त्रासले आहेत. नागरिकांतर्फे प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा देताच १५ जानेवारी रोजी भुसावळ नगर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

तात्पुर्ती उपाययोजना ….
सांडपाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट करणे आवश्यक असतानाही पालिकेने एकाच जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्यास सुरुवात केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या दलदलीमुळे जेसीबीने काम पूर्ण केले नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा दलदलीचा अति महत्वाचा भाग स्वच्छ करणे सोडून दिला. सार्वजनिक वापराचे सांडपाणी तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
भयंकर रोगराई पसरण्याची शक्यता….
स्वच्छतेचा संवेदनशील विषय असल्यावरही नगरपालिका प्रशासनाने कामात दिरंगाई केली. उपाययोजना कायमस्वरूपाच्या नसून तात्पुरत्या आहेत. दोन दिवसात पुन्हा हे सांडपाणी पूर्ण भूखंडावर पसरून याठिकाणी डासांना पोषक वातावरण होणार आहे आणि पुन्हा जैसे थी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी भयंकर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून कायम स्वरूपाच्या उपाययोजना होत नसल्याने या त्रासात स्थानिकांना राहावं लागते त्यामुळे तातडीने प्रशासनाने या सगळ्याची दखल घ्यावी आणि यातून मुक्तता करावी हीच अपेक्षा आता या सर्व स्थानिकांची आहे.
सार्वजनिक सांडपाण्याची कायमस्वरूपाची उपाय योजना करावी ही मागणी होती. आंदोलन करू नये अश्या सूचना मुख्याधिकारी यांनी केलेल्या आहेत. २६ जानेवारी २०२५ रोजी भुसावळ नगर पालिका कार्यलयासमोरील आंदोलनांची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिक जबाबदार राहणार नाही.
-प्रा. सीमा धिरज पाटील, तक्रारदार