जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळा प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी १७ जून रोजी सकाळी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी एकाचवेळी छापे मारत १२ संशयितांना अटक केली होती.
यात काही बड्या व्यावसायिकांसह मोठ्या राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याने खळबळ उडाली होती. अटक केलेल्या ११ कर्जदारांनी कोट्यवधींचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी १७ कोटी १४ लाख ४४ हजार ४९३ रुपयांच्या कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी ठेवीदारांकडून मुदत ठेव पावत्या एजंटमार्फत कमी किमतीत खरेदी केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने पुण्याच्या विशेष न्यायालयात दिली आहे.
ते एजंट कोण?
दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांनी एजंट अनिल पगारिया, संतोष बाफना, अशोक रुणवाल, अजय ललवाणी यांच्यासह अन्य एजंटची साखळी तयार केली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. संशयितांनी ठेव पावत्या ठेवीदारांकडून गोळा करण्यासाठी नेमलेले अजून इतर एजंट कोण-कोण आहेत व त्याचा गुन्ह्यात काय सहभाग आहे, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
तसेच तपासात सुनील झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयातील संगणकामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या पोलिसांना मिळून आल्या आहेत. या याद्यांशी त्यांचा काय संबंध आहे, या दिशेनेही पोलिसांना तपास सुरू आहे.
यांना केली आहे अटक
भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रमोद किसनराव कापसे (अकोला), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम रामनारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांना अटक केली आहे.