जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी हा सर्व सणांचा राजा मानला जातो. या सणाच्या दिवशी येथे गरीब लाभार्थी स्वस्त धान्य दुकानासमोर १००/- रुपयाच्या आनंदाचा शिधा घेण्यासाठी लांबच लांब रांगा करून उभे असल्याचे आढळून आले. तर दुसरीकडे बेकऱ्यांसमोर सुद्धा नानखटाई व इतर पदार्थ बनवण्यासाठी तळागाळातील नागरिक व गरीब कुटुंबातील महिला रांगेत उभ्या असल्याचे दिसून आले. श्रीमंत लोकांची दिवाळी आनंदाची मात्र गरीबाची दिवाळी कष्टाची असते. असे म्हटल्यांच वावगे होणार नाही. थोडक्यात दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना स्वस्त धान्य दुकानावरील शिधा घेण्याकरिता तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे तसेच नानखटाई बनविण्यासाठी गरिबांना रांगेत आपला नंबर येण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
एरंडोल शहरात व तालुक्यात दिवाळीनिमित्त अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप स्वस्त धान्य दुकानांवर होत आहे. फक्त शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो साखर, रवा , चनादाळ , पामतेल असे दिवाळी किट वाटप केले जात आहे. या किट साठी गरीब लाभार्थ्यांची स्वस्त धान्य दुकानावर झुंबड उडाली आहे. तालुक्यात या योजनेचे एकूण लाभार्थी २५ हजार ४०० इतके आहेत विशेष हे की, दिवाळीनंतर सुद्धा पूर्ण किट संपेपर्यंत वाटप केले जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले.
एरंडोल येथे “गरिबांची दिवाळीचे प्रमुख मिठाई म्हणजे नानखटाई ” असे समीकरण जुळलेले दिसून येते बेकऱ्यांवर नानखटाई बनवण्यासाठी सर्व बेकऱ्यांवर गृहिणींची मोठी गर्दी झालेली आहे. दरम्यान स्वस्त धान्य दुकान वरील गर्दी व बेकऱ्यांवरची गर्दी पाहून गरिबांची दिवाळी रांगा लावण्यातच साजरी केली जाते असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.