किमान थोडीतरी लाज बाळगा… ; भुसावळात राज्य मंत्री बच्चू कडूंनी मुख्याधिकार्यांना सुनावले..
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । कंत्राटी सफाई कामगारांना 12 हजार वेतन असताना अवघे आठ हजार रुपये मिळत असल्याची कबुली कामगाराने राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिल्यानंतर मंत्र्यांनी संतप्त होत मुख्याधिकाऱ्यांना किमान थोडीतरी लाज बाळगा, पगार घेता मात्र किमान दहा हजारांइतके तरी काम करा, असे खडे बोल त्यांनी सुनावत दलितांवर अत्याचार करता त्यामुळे तुमच्यावर अॅट्रासिटी दाखल करून तुम्हाला अंदर (जेलमध्ये) टाकायला हवे, असा संताप राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
भुसावळ शहरातील नवीन प्रांत कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठक मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झाली. रमाई योजनेबद्दल माहिती विचारल्यानंतर अल्प लाभार्थींना घरे मिळाल्याने त्यांनी तीव नाराजी व्यक्त केली. टार्गेट आपण पूर्ण करू शकत नाही याबद्दल मंत्र्यांनी खंत व्यक्त केली. गरीबांच्या घराविषयी तुम्हाला आस्थाच नाही, फुकटचा पैसा खाता, लाज वाटायला हवी, असे खडे बोल त्यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना सुनावले. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने गोर-गरीबांसाठी राबवण्यात येणार्या योजनांविषयी विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी मुख्याधिकार्यांची कान उघाडणी केली तर माहिती नसलेल्या अभियंत्याच्या पगारातून दहा हजारांची कपात करण्याची सूचना प्रांताधिकारी कैलास कडलग यांना केली. यावेळी आमदार संजय सावकारे, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी उपस्थित होते.
राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून बच्चू कडूंनी संबंधित अधिकार्यांना यावेळी चांगलेच झापले. फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला, लाथच मारायला पाहिजे, किमान थोडीतरी लाज बाळगा, काम करा, असे उपदेशही त्यांनी केला. एससी लोकांसाठी रमाई योजना असून त्यासाठी वेगळे अर्ज मागवा, ते लगेच मंजूर होतात, केंद्राकडे जायची गरज नाही, असे सांगून त्यांनी रमाई योजनेसाठी आपण टेबलच का नाही ठेवला म्हणून अधिकार्यांना तासून काढले. रमाईच्या घरकुलासाठी डीपीआर वगैरे लागत नाही. हे तुमचं अज्ञान आहे, असे त्यांनी मुख्याधिकार्यांना उद्देशून सांगितले.मला किमान या महिन्यात रमाईचे प्रस्ताव पाठवा, असे बच्चू कडूंनी मुख्याधिकार्यांना यावेळी बजावले.