भुसावळला ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार उघड ; दोघांना अटक

एप्रिल 21, 2021 10:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । भुसावळला ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शनची १५ ते २० हजारांत विक्री करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी आज बुधवारी (ता. २१) अटक केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

remdesivir injection

राज्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, यावर प्रभावी असलेले ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. भुसावळ शहरातही हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकत नाही. ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. साठेबाज रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन चढ्या दराने विकत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यात बद्री प्लॉटमधील ओम पॅथॉलॉजीमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनची तब्बल १५ ते २० हजारांत विक्री केली जात होती. याची पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. पोलिसांनी सापळा रचून संशयितांनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये ५४०० रुपयाला मिळणारे शंभर एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन व ३४०० रुपयाला मिळणारे रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले. पोलिसांनी लॅबचालक विशाल शरद झोपे (वय २८, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (वय १८, मानमोडी, ता. बोदवड) यांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संशयितांनी आतापर्यंत या माध्यमातून ३० ते ३५ नागरिकांना या इंजेक्शनची विक्री केल्याचे समजते. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्‍वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने कारवाई केली. बाजारपेठ पोलिसात फूड अँड ड्रग निरीक्षक अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now