जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला बेवारसरीत्या बॅग ठेवून सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणार्या रेल्वे प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याचा जवाब नोंदवण्यात आला. बेवारसरीत्या रेल्वे स्थानकात बॅग ठेवून अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी त्या रेल्वे प्रवासीच्या विरोधात १४५ ब रेल्वे अॅक्ट अन्वये पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यास सोडून देण्यात आले, असे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.मीना यांनी सांगितले.
रजतकुमार बदलू (वय १९, लालगंज, जि.उनाव, उत्तरप्रदेश) असे त्या रेल्वे प्रवाशाचे नाव आहे. गुरुवारी रोजी येथील रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला प्रवासी बाहेर पडण्याच्या बाजूला असलेल्या गेटजवळ उत्तरप्रदेशातून बंग्लोर येथे सेंट्रींग काम करण्यासाठी निघालेल्या १२ तरुण प्रवाशांपैकी एका तरुणाने बॅग बेवारसरीत्या ठेवल्याची घटना दुपारी ४ वाजता उघडकीस आली होती. बॅगेत औषधे सांडल्यानंतर ती ओली झाल्याने प्रवाशाने बॅग बेवारसरीत्या स्थानकाबाहेर सोडली असली तरी त्यात बॉम्ब असल्याच्या शक्यतेने सुरक्षा यंत्रणा पुरत्या हादरल्या होत्या.
दरम्यान, जळगावच्या बीडीडीएस पथकाने सायंकाळी ७ वाजता तपासणी अंती बॅगेत काही संशयास्पद नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर यंत्रणेसह प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला होता. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी प्रवासी रजतकुमार बदलूसह अन्य 11 प्रवाशांना चौकशीकामी ताब्यात घेतले होते. प्रवाशांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे व बॅगेत संशयास्पद काहीही आढळून न आल्याने प्रवाशाला रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली व त्यानंतर त्यास सोडून देण्यात आले.