जळगाव लाईव्ह न्यूज । केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इराण-अमेरिका संघर्षाचा सावट दूर होताच केळीच्या बाजारपेठेत मोठी उभारी पाहायला मिळत असून, अवघ्या महिनाभरात केळीच्या दरात १४०० ते १५०० रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यात इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्कळीत झाली होती. परिणामी, केळीचे दर कोसळून प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. केळीचे दर घसरल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. उत्पन्न खर्चही निघत नसल्याने उत्पादक हवालदिल झाले होते, मात्र आता परिस्थिती सुधारू लागल्याने निर्यात पुन्हा सुरळीत होत असून, त्याचा सकारात्मक परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे.

गेल्या महिन्याभरात केळी दरात तब्बल १४०० ते १५०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे केळीचे दर १७०० ते २१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे केळीला मागणी वाढत असली, तरी कडक उन्हामुळे आवक मात्र काहीशी कमी झाली आहे. केळीची मागणी मात्र कायम आहे. व्यापाऱ्यांच्या मते, ही तेजी पुढील किमान महिनाभर टिकून राहण्याची शक्यता आहे.







