Dharangaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । कोरोनाच्या महामारीमुळे २ वर्ष या उत्सवाचे आयोजन म्हणजेच नियोजीत मार्गावरून मिरवणुकी काढता आल्या नसल्या तरि या गौरवशाली परंपरेत खंड पडू न देता मंडळाने यथाविधी पूजा करून श्रीबालाजी मंदिरातच प्रत्येक वहनावर श्रीबालाजी भगवानांना विराजमान करून भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करून दिली होती. यावर्षापासून हा पारंपारीक व गांवातील सर्व समाजांना एकत्र आणणारा उत्सव मोठ्या उत्साहाने व जल्लोशात साजरा करता येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी.आर.पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. डी.आर.पाटील पुढे म्हणाले की, वहनाच्या बैलजोडीसाठी लिलाव आपण नुकताच घेतला अत्यंत उत्साहाने भाविकांनी भाग घेऊन अधिकाधिक मंडळाला देणगी देवून बैलजोडी जुंपण्याचा मान मिळवला. यासाठी भाविकांमध्ये मोठी चुरस लागली होती. यावर्षीचा दररोजचा कार्यक्रम प्रत्येक वहनाला लागणा-या बैलजोडीधारकांचे नाव स्वतंत्रपणे सोबत दिले आहे, आपण या सर्व कार्यक्रमास योग्य त्या पद्धतीने प्रसिद्धी देवून अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढेल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करतो.
घटस्थापनेपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता श्री बालाजी मंदिरा पासून मिरवणुकीस प्रारंभ होईल. ठरलेल्या मार्गावरून वहनाचे दर्शन भाविकांना घेता येईल. नेहमीप्रमाणे आपल्या गांवातील लेझीम मंडळे मिरवणुकीत वाजंत्रीसह सहभागी होतील, रोजच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लेझीम चमुला श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे दररोज प्रत्येकी रु. ५००/-बक्षीस देण्याचा निर्णय यावर्षी मंडळाने घेतला आहे. यासाठी प्रत्येक चमुने दररोज संध्या. ६ वाजेच्या आंत नाव नोंदणी, रात्री ८ वाजेच्या आंत मिरवणुकीत किमान १५ खेळाडू व वाजंत्रीसह सहभाग आवश्यक करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या मादक द्रव्यांचे सेवन न करता लेझीम चमुंनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत आहे.
दुर्गादेवी, मारोती व रथोत्सवाच्या दिवशी रात्रभर वाजंत्रीची परवानगीची मागणी काही युवकांनी केली होती. त्याप्रमाणे मंडळाचे पदाधिकारींनी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री. गुलाबरावजी पाटील व स्थानीक पोलीस अधिकारी श्री.राहूल खताळ यांना प्रत्यक्ष भेटून तसे निवेदन दिले आहे. यात सकारात्मक विचार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा. ना श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक यांचेशी चर्चा करू व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून निर्णय करु असे आश्वासन मा.पालकमंत्र्यांनी दिले आहे. तथापी दररोजच्या वहन मिरवणुकीस रात्री १० व दुर्गादेवी व मारोती (अष्टमी व नवमी) च्या वहनांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत वाजंत्रीसह मिरवणुकीस मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी आहे. या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधीत राखण्यासाठी सर्व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील प्रा. पाटील यांनी केले.
रथोत्सवाच्या दिवशी दु.३ वा. श्रीबालाजी भगवानांची यथासांग पूजा संस्थानचे पुजारी श्री.गणेश व सौ. उज्वला पुराणीक, श्री कालीदास पुराणीक व कुटुंबीय करतील. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना. श्री. गिरीषभाऊ महाजन जळगाव ग्रामीणचे खासदार मा.श्री. उन्मेशदादा पाटील, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हयाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, तहसीलदार नितीन देवरे, न.पा.प्रशासक जीजाबराव पवार, पी. आय. राहुल खताळ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते आरती होवून रथोत्सवाला प्रारंभ होईल. या मिरवणुकीत गांवातील लेसीम मंडळे, विवीध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होवून शिस्तीचे प्रदर्शन करतील. संपूर्ण पंधरवाड्यात भाविक बंधु भगिनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतील असा विश्वास आहे.
।।स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्ष।।
आपल्या देशाला परकीय गुलामगीरीतून मुक्त करण्या साठी अनेक क्रांतीकारक देशभक्तांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे, या स्वातंत्र्यप्राप्तीचे हे ७५ वे म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आहे . आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आजच्या युवकांसमोर यावा यासाठी विविध कार्यक्रम, समाजोपयोगी, रचनात्मक व विधायक उपक्रमांचे आयोजन श्रीबालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमांचा विचार करण्यासाठी गांवातील काही प्रतिष्ठीत व मंडळातील काही सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशी नुसार
उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
॥ मंदिर जिर्णोध्दारासाठी प्रत्येक घरातून देणगी ॥
आपल्या श्रीबालाजी मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम सुरु आहे, कच्छच्या खाणीतील ‘सोनपाषाण ‘ दगडात बांधल्या जाणाऱ्या मंदिराचे काम प्रगती पथावर आहे, या जिर्णोद्धारासाठी गांवातील भाविक मोठ्या श्रध्देने आपापल्या परीने देणगी देत आहेत. आपल्या गांवातील प्रत्येक घरातून आपण निधी जमा करीत आहोत, लवकरच प्रत्येक गल्लीतील प्रत्येक घरातुन निधीसंकलनाचे काम व्यापक स्वरुपात सुरु करणार आहोत, खऱ्या अर्थाने गावाचे मंदिर उभारले जाणारे हे ग्रामदैवत ठरावे असा मंडळाचा प्रयत्न आहे. श्रीनारायण भक्तिपंथाचे मुख्यप्रवर्तक प.पु. लोकेशानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने शास्त्रोक्त पद्धतीने सर्वांच्या सहभागाने उभे रहाणारे हे मंदिर आपल्या गांवाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिक ठरेल असे वाटते. आपल्या या मंदिराच्या उभारणी साठी बाहेरगावातुनही सहकार्य मिळत आहे. गुप्तदान ही मिळाले आहे. दिल्लीतील एक भक्त मुख्य गाभाऱ्यात विराजमान होणा-या श्रीबालाजी भगवानांची ६३ इंचाची मुर्ती व अनुषंगीक मुर्त्या सेवा म्हणून देणार आहे. मंदिराचे पुजारी श्रीपुराणीक कुटुंबीयांना त्यांच्या निवासस्थानांसाठी मंडळाने स्वतंत्र प्लाॅटस घेवून दिले आहेत, त्यामुळे मंदिरात निवासस्थान नसल्यामुळे प्रशस्त असे सभामंडप, उत्तरेस वहनांच्या मुर्त्यांसाठी सुशोभीत अशी स्वतंत्र व्यवस्था करता येणार आहे. त्यामुळे भाविकांना श्रीबालाजी भगवानांचे दर्शन घेतांना वहनावरिल मुर्त्याही पहाता येतील. आपले मंदिर शासनाने ‘ क ‘ वर्गाच्या तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. मंडळाच्या जागेवर सभागृह, भक्तनिवास व चोपडारोड वर भव्य गेट, रस्ता इ. साठी शासनामार्फत काम सुरू आहे. या सभागृहात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासीका, आरोग्य केंद्र वाचनालय असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी, विनंती देखील प्रा. पाटील यांनी केली. यावेळी मंडळाचे अध्सक्ष डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, किरण वाणी जीर्णोध्दार प्रमुख जीवन बयस, सचिव प्रशांत वाणी व अशोक येवले यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.