⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सावधान.. तुमचा मोबाईल अंडरकटिंगचा आहे का? जळगावात मोठे रॅकेट सक्रिय!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । आजकाल मोबाईलचा वापर घरोघरी प्रचंड वाढला आहे. जसजशा मोबाईलच्या किमती कमी होतात आणि बाजारात नवनवीन मोबाईल येतात तसे मोबाईल बदलणारे ग्राहक देखील अनेक आहेत. ऑनलाईन मोबाईल खरेदीला मोठी मागणी असली तरी आजही स्थानिक मार्केटमधून मोबाईल खरेदी करण्याला अनेक ग्राहक प्राधान्य देतात. जळगावात मोबाईल अंडर कटिंग करणारे मोठे रॅकेटच सक्रिय असल्याची शंका व्यक्त होत आहे. एकच मोबाईल दोन व्यक्तींच्या नावे विक्री केला जात असून ग्राहकाला तो प्रकार लक्षात देखील येत नाही. दुचाकी, चारचाकी किंवा इतर मालमत्ता खरेदी-विक्री करताना नागरिक एखादा स्टॅम्प किंवा हमीपत्र भरून घेतात मोबाईलच्या बाबतीत मात्र तसे काहीच नाही.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट म्हटले म्हणजे मोबाईल मार्केट झाले आहे. एकट्या गोलाणी मार्केटच्या परिसरात शेकडो मोबाईल विक्री आणि दुरुस्तीची दुकाने आहे. मोबाईलच्या माध्यमातून दररोज लाखोंची तर कधी करोडोंची उलाढाल होत असते. बहुदा मुंबईनंतर जळगावात इतके मोठे मोबाईल मार्केट असावे. गोलाणी आणि परिसरात असलेली सर्व मोबाईलची दुकाने चालतात तरी कशी असा प्रश्न अनेकदा सर्वसामान्यांना पडतो. घाऊक विक्रेत्याकडून ३० ते ६० दिवसांच्या मुदतीने माल मिळत असल्याने पैशांचे गणित तिथूनच फिरते. त्यात मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्याची सोबत असल्याने दुकानाचे भाडे आणि खर्च देखील निम्मा-निम्मा होतो.

आजकालच्या जमान्यात मोबाईल खरेदीचा विषय आला आणि त्यातल्या त्यात भन्नाट सूट हवी असल्यास ग्राहकांकडून ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले आहे. बहुतांश मोबाईल कंपन्या तर आता नवीन मोबाईल देखील ऑनलाईन ऑफरद्वारेच लॉंच करतात. भरगोस सूट मिळत असल्याने ग्राहक देखील आकर्षित होतात. विशेषतः सणोत्सवच्या काळात मोठमोठे ऑनलाईन सेल लागत असल्याने खरेदीसाठी झुंबड उडत असते. जळगावात दुकानावर भेटणाऱ्या किमतीपेक्षा कितीतरी अधिक कमी किमतीत मोबाईल ऑनलाईन भेटत असतो. कधी कधी तर ४० ते ५० टक्के सूट असते.

जळगावात काही दुकानदारांनी मोबाईल खरेदी-विक्रीचा नवा फंडा शोधून काढला आहे. जमतारा वेबसीरीजप्रमाणे ऑनलाईन मोबाईल नोंदणी करणारी देखील एक टोळी सक्रिय आहे. जेव्हा एखाद्या कंपनीचा ऑनलाईन सेल सुरु होतो तेव्हा ठराविक मिनिटात सर्व मोबाईल विक्री होऊन स्टॉक संपतो. मुळात असे होते कसे तर मोबाईल नोंदणी करायला बसलेली गॅंग एकाच पत्त्यावर अनेक मोबाईल बुकिंग करून घेतात. अगोदर सवय झालेली असल्याने तात्काळ माहिती भरणे आणि मोबाईल नोंदणी करणे त्या गॅंगला शक्य होते. एखादा नवखा ग्राहक बिचारा माहितीच भरत असतो तोवर सर्व मोबाईल विक्री होऊन गेलेले असतात.

मोबाईल बुकिंग नंतर खरा खेळ सुरु होतो. मोबाईल नोंदणी करणारी गॅंग महाराष्ट्राबाहेर कुठेतरी बसलेली असते. जळगावातील दुकानदाराने अगोदरच त्यांना मोबाईलची ऑर्डर दिलेली असते. मोबाईल नोंदणी केल्यावर जळगावातील अज्ञात किंवा सहजासहजी कुणालाही कळणार नाही असा पत्ता त्यावर टाकलेला असतो. एखाद्या कुरिअर सेवेच्या माध्यमातून पार्सल जळगावात येताच संबंधित मोबाईल क्रमांकावर डिलिव्हरी करणारा व्यक्ती संपर्क करतो आणि सांगितलेल्या पत्त्यावर माल देऊन येतो. ओटीपी क्रमांक मिळत असल्याने तो त्याचे काम योग्य पद्धतीने करतो.

मूळ ३० हजार किंमत असलेला मोबाईल एखाद्या ऑफरमध्ये २२ हजारात ऑनलाईन मिळत असला तर असे अनेक मोबाईल खरेदी केले जातात. नोंदणी करणाऱ्याला प्रति मोबाईल किमान ५०० रुपये कमीशन देण्यात येते. मोबाईल जळगावात आल्यावर इतर ग्राहकांना तो ऑनलाईनच्या ऑफर संपलेल्या दरात म्हणजेच साधारणतः २५ ते २८ हजारात विक्री केला जातो. ग्राहकाचा देखील फायदा होत असल्याने तो मोबाईल खरेदी करतो. मुळात मोबाईल ऑनलाईन खरेदी करणारा दुसराच आणि स्थानिक खरेदीदार तिसराच कुणीतरी असतो.

सध्या ग्राहकांना स्थानिक दुकानदार स्वतःच्या दुकानाचे बील देत असला हे खरे असले तरी कंपनीकडे मात्र दुसऱ्याच कुणाच्या तरी नावाची नोंदणी असते. ग्राहकांना भविष्यात मोबाईलसंबंधी सेवा मिळविण्यात काही अडचणी येत नसल्या तरी हे जे सुरु आहे हे नियमबाह्यच आहे हे मात्र निश्चित आहे. मोबाईल मार्केटच्या लाखोंच्या उलाढालीकडे आजवर न आयकर विभागाने ना जीएसटी ना पोलीस विभागाने लक्ष वेधले आहे. अनेक मोबाईल विक्रेत्यांकडे तर जीएसटी क्रमांक देखील नाही. जळगावात सुरु असलेली हि पद्धत नक्कीच देशभरात सुरु असेल यात शंका नसून भविष्यात काहीतरी झोल समोर आला तर त्यात वावगं वाटता कामा नये.