LCB Jalgaon : ५० लाखांची टीप मिळाल्याने भरवस्तीत दरोड्याचा प्रयत्न, एलसीबीने शोधली टोळी

जळगाव लाईव्ह न्यूज । दि.१७ जून २०२२ । जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ऑर्किड हॉस्पिटल शेजारी राहणाऱ्या रिद्धी अशोक जैन (वय २७) या दि. १२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान, टीव्ही पाहत असताना एक अनोळखी भामटा व त्याचे ५ साथीदाराने घरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला.दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या आईला खाली ओढून जमिनीवर पाडले व गळा दाबला. याप्रकरणी जैन यांनी दि.१३ रोजी जिल्हापेठ पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीच्या पथकाने गुन्ह्याचा शोध लावला असून सहा अट्टल संशयितांची टोळी शोधली आहे. पथकाने दोघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. दरम्यान, घरात ४५ ते ५० लाखांची रोकड असल्याची टीप मिळाल्यानेच दरोडा टाकण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

जळगाव शहरात भरवस्तीत रात्री ८.३० च्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांना दरोडेखोरांनी खुले आव्हान दिले होते. दरोडेखोर रिकाम्या हाती परतले तर इतर काही ठोस पुरावे नसल्याने पोलीस देखील चक्रावले होते. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलीस अधीक्षकांनी एलसीबीच्या निरीक्षकांना गुन्ह्याच्या शोधासंदर्भात सूचना दिल्या होत्या. बकाले यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके नेमली होती. गुन्ह्याच्या शोधासाठी पथकांमध्येच स्पर्धा लागून होती. पथक दिवसरात्र गोपनीय माहिती काढणे, तांत्रिक बाबी तपासणे, सीसीटीव्ही फुटेज काढणे अशा पद्धतीने तपास करीत ६ संशयितांची नावे निष्पन्न केली होती.

हे देखील वाचा : Cyber Crime : सेवानिवृत्त वृद्धाला ६२ हजारांचा लावला चुना, युपी, दिल्लीच्या आरोपींकडून हस्तगत केले २० लाख रोख तर १८ लाख गोठवले

संशयितांची माहिती मिळाल्यावर दि.१७ रोजी एलसीबीच्या निरीक्षकांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून वेगवेगळे ६ पथके तयार करुन सर्वांना एकाच वेळी ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. सागर जयंत पाटील वय-२५ मुळ रा.कुसुंबा बु ता. रावेर ह.मु. श्री. अपार्टमेंट राम समर्थ कॉलनी, जळगाव यांस प्रथम ताब्यात घेवून त्याला विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत इतरांची नावे सांगितली. पथकाने प्रशांत शिवाजी पाटील वय २७ रा. मातोश्री नगर, धरणगाव, कमलेश प्रकाश सोनार रा. गाडगेबाबा नगर, पाचोरा, प्रमोद कैलास चौधरी रा. कळमसरा ता.पाचोरा, गोविंद शंकर पाटील रा.कळमसरा ता.पाचोरा, गणेश बाबुराव पाटील (धनगर) रा.शेंदुणी ता.जामनेर असे असल्याचे सांगितले. पथक एकाच वेळी रवाना झाले असता आरोपी प्रशांत शिवाजी पाटील वय-२७ रा.मातोश्री नगर, धरणगाव ता. धरणगाव हा सुध्दा घरी मिळून आल्याने त्यास सुध्दा ताब्यात घेतले. इतर आरोपी अगोदरच त्यांचे घरून पसार झाल्याने ते घरी मिळून आले नाही.

गुन्हयांत सागर जयंत पाटील व प्रशांत शिवाजी पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सागर पाटील हा बेरोजगार असून त्याचेवर यापूर्वी जिल्हापेठ पो.स्टे. ला गु.र.नं. ११७/२०२० भादंवि क.४०८, ४२०, २०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच कमलेश प्रकाश सोनार याचेवर १) पाचोरा पो.स्टे. गु.र.नं. १९१/२०१३ भादंवि क.३०२,३९७, २) पाचोरा पो.स्टे. गु.र.नं. ३२४/२०२० भादंवि क.३९२, २०१,३४ असे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रमोद चौधरी याचेवर पहर पो.स्टे.ला गु.र.नं. ४५७ /२०२१ भादंवि क. ३९२, ३४१.३४ वाढीव क ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयांतील इतर फरार आरोपीतांचा अदयाप पावेतो शोध सुरु आहे.