जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांचे नगरदेवळा येथील राहते घर अज्ञातांनी मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या आईच्या जागरुकतेमुळे पुढील अनर्थ टळला असला तरी, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसम नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळी आले होते. नगरदेवळा (ता पाचोरा) मधील राऊळ गल्लीतील गणपती मंदिराजवळ दुचाकी उभी करून एक हल्लेखोर लोखंडी गेटवरून उडी मारत थेट घराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचला. त्याने बिलसरीच्या बाटलीतून पेट्रोल ओतून दरवाजावर आग लावली आणि दोघेही अंधारात पसार झाले.

घटनेच्या वेळी राऊळ यांच्या आई नंदकोर राऊळ व बहीण किरण राऊळ घरात झोपलेल्या होत्या. पेट्रोल व धुराचा वास आल्याने नंदकोर राऊळ यांना जाग आली असता त्यांना दरवाजाचा पडदा जळत असल्याचे निदर्शनास आले. शॉर्टसर्किट झाले असावे असा संशय आल्याने त्यांनी मुलगी किरणला उठवून तत्काळ पाण्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर दरवाजा उघडून शेजाऱ्यांना बोलावण्यात आले. तपासणीदरम्यान दरवाजाजवळ पेट्रोलची बाटली, आगपेटी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.

शेजारील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री 2.58 वाजता नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर दोन व्यक्ती आलेल्या स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. हे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात जाळपोळ करण्याचा प्रयत्न, जीवितास धोका निर्माण करणे आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर झालेला हल्ला ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी दिली आहे. तपासात सहायक फौजदार निवृत्ती मोरे व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे मदत करीत आहेत.









