जळगाव जिल्हा

Dharangaon : वाळू माफियांची दहशत: महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी मध्यरात्री प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले !

गिरणा नदीतील वाळू उपसा करण्यासाठी लिलाव झाला नसल्याने नदीतून वाळू उपसा करण्यावर बंदी आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांना धुडकावून वाळू माफिया रात्रीच्या अंधारात चोरून वाळूची वाहतूक करत आहेत. बांभोरी, निमखेडी, आव्हाणे, चांदसर या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी ही अवैध वाहतूक सुरू आहे.

याच दरम्यान, 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2:15 धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बु (ता धरणगाव) येथील गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर नायब तहसिलदार महसूल संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक,मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण 12 ते 15 लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला.

अचानक हल्ला झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांसह पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे धाव घेतली. यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना पावड्याने,लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर जाणीवपूर्वक फावडे मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले. दरम्यान, वाळू माफियांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.

दरम्यान, वाळू माफियांकडून प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ही घटना या अवैध कारवायांचा भाग आहे ज्या रात्रीच्या अंधारात सुरू असतात. प्रशासनाला आता या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button