जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून अवैध धंदे, चोरी, जीवघेणे हल्ले, खून अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच शहरातील शाहूनगर परिसरात खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या तरुणावर 3 अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रतीक निंबाळकर असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान तरुणाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे.
2020 मध्ये जळगाव शहरात झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक निंबाळकर हा कारागृहात होता न्यायालयाच्या आदेशाने आजच तो जामीनावर बाहेर आला होता. मात्र त्याच्यावर दबा धरून बसलेल्या तीन संशयीतांनी शाहूनगर परिसरात त्याला गाठत प्राण घातक हल्ला केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यामागे 2020 च्या हत्या प्रकरणाचा संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
Jalgaon : जामिनावर बाहेर आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तरुणावर प्राणघातक हल्ला ; जळगावातील खळबळजनक घटना
