जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील तिघांना काही जणांनी ५रोजी दुपारी दशक्रीया विधीच्या कार्यक्रमात मारहाण केली होती. तेव्हापासून तिघांपैकी उत्तम ऊर्फ पिंटू रघूनाथ ढोणी (वय ३३) हा युवक बेपत्ता होता. बुधवारी सकाळी शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. उत्तम याने अपमान सहन न झाल्याने आत्महत्या केली असावी अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. तर मारहाण करणाऱ्यांनी त्याचा खून केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.
कापूसवाडी गावात मंगळवारी दशक्रीया विधीसाठी नागरिक जमले होते. याच कार्यक्रमात उपस्थितांपैकी दोघांना काहींनी मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी गेला असता उत्तम ढोणी यालाही यावेळी जबर मारहाण झाली होती. घटनेनंतर उत्तम तेथून निघून गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. बुधवारी सकाळी उत्तम याच्या शेताजवळ त्याची क्रुझर गाडी लावलेली होती. तर शेजारच्या शेतात त्याचा मृतदेह पडलेला आढळला. पोलिस निरिक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी कापूसवाडी गाठले. तसेच मृतदेह जामनेर उपजिल्हा रूग्णालयात रवाना केला. मात्र खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने पोलिस निरिक्षक शिंदे यांनी जिल्हा रूग्णलयात ईनकॅमेरा शवविच्छेदनाचा निर्णय घेतला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली.